
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यर आणि रवी बिष्णोई यांचा समावेश करण्यात आला आहे. तिलक वर्माला पोटाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे मालिकेतील पहिले तीन सामने खेळता येणार नाहीत. त्यामुळे त्या सामन्यांसाठी त्याच्या जागी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी तिलकची उपलब्धता त्याच्या पुनरागमनाच्या प्रगतीवर अवलंबून असेल.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात दंडाच्या स्नायूला दुखापत झाल्याने वॉशिंग्टन सुंदर टी–20 मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी लेगस्पिनर रवी बिष्णोईचा समावेश करण्यात आला आहे. बराच काळ संघाबाहेर असलेले श्रेयस आणि बिष्णोई पुन्हा टी-20 संघात परतले आहेत. श्रेयसने दोन वर्षांनंतर टी-20 संघात पुनरागमन केले आहे.





























































