
कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात झालेल्या अखेरच्या टी-20 लढतीत टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत टीम इंडियाने दमदार कामगिरी केली.
कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकीय खेळी आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिपक चहरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 लढतीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 111 धावांमध्ये गारद झाला.
टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. हर्षल पटेल याने 2, तर दिपक चहर, युझवेंद्र चहल आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी एक बळी घेतला.
रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या रोहित (56 धावा) आणि ईशान किशन या जोडीने टीम इंडियाला 69 धावा करत चांगली सुरुवात दिली. किशन 21 धावा काढून बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव शून्य आणि रिषभ पंत 4 धावा हे झटपट बाद झाले. यानंतर श्रेयस अय्यरने 25 आणि व्यंकटेश अय्यरने 20 धावा काढत चांगली भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये दिपक चहरने फटकेबाजी करत संघाला 180 चा टप्पा पार करून दिला.
12 षटकं गोलंदाजी, 36 धावा अन् 10 विकेट्स, फिरकीपटूची 115 वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी
न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदाज मिशेल सँटनर याने सर्वाधिक 3 बळी घेतले. ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्यूसन आणि इश सोढी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मिल्ने आणि फर्ग्यूसन यांना टीम इंडियाच्या फलंदाजांनी 11 च्या सरासरीने धुतले.




























































