12 षटकं गोलंदाजी, 36 धावा अन् 10 विकेट्स, फिरकीपटूची 115 वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील झालेल्या विक्रमांची नेहमीच चर्चा होते. मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेटमध्ये झालेल्या एका विक्रमाची क्रीडा वर्तुळात चर्चा सुरू आहे. येथे एका फिरकीपटूने 4 दिवसांच्या लढतीत धमाकेदार गोलंदाजी केली. शॉन व्हाईटहेड असे या गोलंदाजाचे नाव असून त्याने एका डावात 10 बळी मिळवले आहेत.

साऊथ वेस्टर्न जिल्ह्याकडून खेळताना डावखुरा फिरकी गोलंदाज शॉन व्हाईटहेड याने कमाल गोलंदाजी केली. त्याने 12 षटकांच्या गोलंदाजीत अवघ्या 36 धावा देत विरोधी संघाच्या सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. शॉनच्या या दमदार कामगिरीच्या बळावर साऊट वेस्टर्न डिस्ट्रीक्ट संघाने इस्टर्न्स संघाचा डाव 65 धावांमध्ये गुंडाळला. शॉन याने आपल्या अफलातून गोलंदाजी दरम्यान दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला, तर 3 फलंदाजांना पायचित केले. अन्य पाच फलंदाजांना त्याने कॅच आऊट घेतले.

संपूर्ण लढतीत शॉन व्हाईटहेड याने एकूण 15 बळी मिळवले. पहिल्या डावात त्याने 64 धावा देत 5 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात 36 धावा देत 10 बळी मिळवले. तसेच फलंदाजीमध्येही त्याने पहिल्या डावात 66 आणि दुसऱ्या डावात 45 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधील देशांतर्गत क्रिकेटबाबत बोलायचे झाले याआधीही एका गोलंदाजाने अशी कामगिरी केली होती. 1906 मध्ये झालेल्या एका लढतीत लेग स्पिनर बर्ट वॉग्नर यांनी 26 धावा देत 10 बळी घेतले होत्या. इस्ट्रन प्रोविन्स संघाकडून खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती.

जगभरात होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात जबरदस्त कामगिरीची नोंद इंग्लंडच्या खेळाडूने केली आहे. केएच वॅरिटा नावाच्या एका गोलंदाजाने 1932 मध्ये यॉर्कशायरकडून खेळताना फक्त 10 धावा देऊन 10 बळी घेतले होते. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे.