नव्या एसी लोकलमध्ये मच्छीचा वास पसरू नये म्हणून खास काळजी, मालडब्याला स्वतंत्र एसी यंत्रणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांसाठी नवीन 47 एसी लोकलचे टेंडर लवकरच काढण्यात येणार असून या एसी लोकलसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात येणार आहेत. तसेच या एसी लोकलला प्रथमच मुंबईचे डब्बेवाले तसेच मच्छी विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र मालडबा असणार असून या डब्यातून इतर डब्यात मच्छीचा वास पसरू नये यासाठी खास काळजी घेण्यात येणार आहे.

नवीन एसी लोकल नव्या तंत्राची असेल. या एसी लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही तर असतीलच शिवाय इतरही काही नवीन फिचर्स असणार आहेत. विशेष म्हणजे हे मालडबे एसी लोकलच्या दोन्ही कडेला असणार असून या डब्यातील पदार्थांचा वास इतर डब्यांत जाऊ नये यासाठी मालडब्याला स्वतंत्र एसी यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी दिली आहे. एमयूटीपी-3मध्ये 47 आणि 3 (अ)मधील 191 अशा 238 एसी लोकलसाठी एमआरव्हीसी लवकरच 20 हजार कोटीची जागतिक निविदा काढणार आहे.