जालन्यातील इंदेवाडीचा लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले; प्लॉटचा फेरफार करण्यासाठी मागितली लाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील लाचखोर तलाठी शिवाजी आनंदराव घुगे याला तक्रारदाराकडून 17 हजारांची लाच घेताना जालन्यातील साई भोजनालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी जालना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने केली आहे. शिवाजी आनंदराव घुगे (54) सजा- इंदेवाडी, जालना( रा. माऊली नगर ,अंबड रोड, जालना) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार त्यांच्या मृत भाऊजींचा प्लॉटींगचा व्यवसाय सांभाळत आहेत. विक्री झालेल्या मौजे इंदेवाडी ता.जि. जालना येथील गट क्रमांक 57 मधील 12 प्लॉटचे फेरफार करून देण्यासाठी तलाठी घुगे यांनी याआधी 25 हजार रुपये स्वीकारले होते. मात्र, पैसे घेऊनही घुगेने फेरफार करून दिले नाही. उलट मंडल अधिकारी काळे यांना प्रत्येक फेरसाठी 5 हजार रुपये प्रमाणे पैसे लागतील असे सांगितले. लाच पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी घुगे याने 25 हजार रुपये पंचासमक्ष शुभम झेरॉक्स सेंटर दुकान,जालना येथे लाच मागणी करून तडजोड अंती 17 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाईदरम्यान मंगळवारी तलाठी घुगे याने साई भोजनालय येथे पंचासमक्ष 17 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घुगे याच्याकडून 17 हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करत घुगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे, अँटी करप्शन ब्युरोचे सापळा अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे, सापळा पथकातील गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे आदींनी केली आहे.