हिंदुस्थानच्या आक्रमकतेमुळे हतबल चीन अस्वस्थ! निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या आक्रमकतेमुळे आता चीन हतबल झाला असून अस्वस्थ आहे. त्यामुळे थेट लढाई करण्याऐवजी तो हिंदुस्थानला मानसिक किंवा सायबर पद्धतीने त्रास देण्याचा मार्ग अवलंबित आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रेटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, चीन दक्षिण समुद्रात वर्चस्व करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हिंदुस्थानने अमेरिका, तैवान आदी राष्ट्रांना सोबत घेऊन त्याबाबत दबाव निर्माण केला आहे. त्यातून चीनवर कुरघोड्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत टाकलेली पावलं अत्यंत विचारपूर्वक आहेत.

काय म्हणाले महाजन

भौगोलिक मर्यादांमुळे चीनला पर्वतरांगातील युद्ध परवडणार नाही. आपल्या जवानांना अशा परिस्थितीत युद्ध करता येते. त्यामुळेच घाबरून मार्शल आर्टच्या लढाईत सक्षम असलेल्यांना चीनने सीमेलगतच्या भागात आणले आहे.

आंतरराष्ट्रीय करारानुसार शस्त्र वापरता येत नसल्यामुळे हा मार्ग चीनने अवलंबिलेला आहे. हिंदुस्थानने सीमेलगतचे आपले जाळे अधिक विस्तारीत करून पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली आहे. त्यामुळे चीनची अस्वस्थता वाढली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी दीर्घकालीन धोरणाची आखणी सरकारने केली पाहिजे. देशातील पक्षीय सरकार बदलले तरी त्या धोरणात बदल न करता ते अधिकाधिक सशक्त केले पाहिजे.