हिंदुस्थानची विजयाष्टमी! अंडर-19 संघाने जिंकला आठव्यांदा आशिया चषक श्रीलंकेवर 9 विकेट, 63 चेंडू राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी सीनियर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य गड सेंच्युरियन सर केला आणि आज हिंदुस्थानचे छोटे उस्ताद म्हणजेच अंडर-19 संघाचे शेर दुबईत अजिंक्य ठरले. पावसाच्या व्यत्ययाने गाजलेली अंडर-19 आशिया चषकाची श्रीलंकेविरुद्धची अंतिम लढत अखेर हिंदुस्थानी युवा संघाने 9 विकेट आणि 63 चेंडू राखून जिंकली आणि आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकावर आठव्यांदा आपले नाव कोरले.

हिंदुस्थानच्या  आजच्या  नेत्रदीपक  विजयाचे शिल्पकार ठरले 11 धावांत 3 विकेट घेणारा विकी ओस्तवाल आणि 67 चेंडूंत नाबाद 56 धावांची खेळी करणारा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी नाबाद 56 हे छोटे उस्ताद. त्यांना कौशल तांबे 23 धावांत 2 विकेट आणि 49 चेंडूंत नाबाद 31 धाव करणारा शेख रशीद यांचीही उत्तम साथ लाभली. याआधी उपांत्य फेरीत हिंदुस्थानने  बांगलादेशचा तर श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी युवा गोलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय आत्मघाती ठरवला. श्रीलंकेने 38 षटकांत 9 बाद फक्त 106 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत 50 ऐवजी 38 षटकांची करण्यात आली होती. हिंदुस्थानी संघाने विजयी लक्ष्य फक्त 1 विकेट गमावून 21.3 षटकांतच सहज पार केले.

हिंदुस्थान आठ वेळा जेतेपद पटकावणारा एकमेव संघ

आतापर्यंत 19 वर्षांखालील आशिया कपचे नऊ वेळा आयोजन झाले आहे. त्यापैकी आठ विजेतीपदे हिंदुस्थानने मिळवली आहेत. 2012 साली हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेतेपद मिळाले होते. पावसाने अंतिम लढत न होऊ शकल्याने उभय संघांना संयुक्त जेतेपद बहाल करण्यात आले होते.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका ः 38 शतकांत 9 बाद 106 (सदिशा राजपक्षे 14, रवी डिसिल्व्हा 15, यासिरू रॉड्रिगे नाबाद 19; विकी ओस्तवाल 8-3-11-3, कौशल तांबे 6-0-23-2) पराभूत विरुद्ध  हिंदुस्थान ः 21.3 षटकांत 1 बाद 104 (अंगक्रिश रघुवंशी नाबाद 56, शेख रशीद नाबाद 31; यासिरू रॉड्रिगे 3-1-12-1).

(डकवर्थ लुईस नियमानुसार)