चीनची नरमाईची भूमिका; शांततेने सीमावाद सोडवण्यावर दोन्ही देशांची सहमती

1131

लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करुन सीमाभागत विनाकारण तणाव वाढवणाऱ्या चीनला आता शांततेचे महत्त्व पटत आहे. हिंदुस्थान-चीनमध्ये शनिवारी लडाखमध्ये झालेल्या कमांडर स्तरावरील बैठकीत चीनने नरमाईची भूमिका घेत सीमावाद शांततेने सोडवण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशातील सीमावाद शांततेने आणि सामंजस्याने सोडवण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले आहे. तसेच शनिवारी झालेली चर्चा सकारात्मक वातावरणात झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. चीनच्या नरमाईच्या भूमिकेने सीमाभागातील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.

लडाखच्या पूर्व भागात दोन्ही देशात सीमा वादातून तणाव निर्माण झाला आहे. हा वाद द्विपक्षीय चर्चेतून आणि शांततेने आणि सामंजस्याने सोडवण्यासाठी चीनने शनिवारी झालेल्या कमांडर सत्रवरील बैठकीत सहमती दर्शवल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. हा वाद सामोपचाराने लवकरात लवकर सोडवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यावर दोन्ही देशांनी भर दिल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

चीनबरोबर लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू राहणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. लडाख सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक मोठ्या संख्येने तैनात आहेत. त्यांना मागे बोलावण्याबाबत काय निर्णय झाला, याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडूबन देण्यात आलेली नाही. सध्या दोन्ही देशातील तणाव कमी करून चर्चेने वाद सोडवण्यावर बैठकीत दोन्ही देशांची सहमती झाली आहे. मात्र, सीमाभागत अजूनही मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या