अर्धा हिंदुस्थान लसवंत; दोन डोस पूर्ण करण्यात हिमाचल प्रदेश पहिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने आता महत्त्वाचा टप्पा पार केला असून देशातील 50 टक्क्यांहून जास्त नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले तर आतापर्यंत 84 टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज ट्विट करून दिली. दरम्यान, लसीकरणात हिमाचल प्रदेशने बाजी मारली असून तिथे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीलाच 53 लाख 86 हजार 393 लोकांनी दोन डोस घेत 100 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात 16 जानेवारी 2021 पासून राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत 127 कोटी 61 लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून गेल्या 24 तासांत 1 कोटी 4 लाख 18 हजार 707 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, 2 फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 1 मार्चपासून 60 वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील तर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्ती आणि सर्वात शेवटी 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

देशात कोरोना लसीकरणासाठी पात्र लोकसंख्येपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. कोरोनाविरोधातील लढाई आपण एकत्र जिंकू. 
– मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्यमंत्री