काबूलमध्ये गुरुद्वाऱ्यात अतिरेकी घुसला, अंदाधूंद गोळीबारात 11 भाविक ठार

जगभरात कोरोना महामारीमुळे दहशत पसरलेली असताना अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे असलेल्या गुरुद्वाऱ्यात घुसून एका अतिरेक्याने अंदाधूंद गोळीबार केला. यात 11 भाविक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने घेतली आहे.

अफगाणिस्तानात जवळपास 300 शीख कुटुंब वास्तव्य करून आहेत. आज काबूल येथे असलेल्या गुरुद्वाऱ्यात सकाळच्या प्रार्थनेसाठी शीख बांधव एकत्र आले होते. प्रार्थना सुरू असतानाच अचानक बंदुकधारी अतिरेकी गुरुद्वाऱ्यात घुसला. या अतिरेक्याने अंदाधूंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात 11 भाविक ठार झाले. गुरुद्वाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच अफगाण पोलिसांनी परिसराची घेराबंदी केली. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत अतिरेकी ठार झाला की नाही हे कळू शकले नाही. गोळीबार करतानाच अतिरेक्याने गुरुद्वाऱ्यात हातबॉम्ब फेकला. यामुळे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात 16 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुद्वाऱ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात तालिबानचा हात असावा अशी शंका सुरूवातीला व्यक्त करण्यात आली. मात्र तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली. त्यानंतर लगेचच इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

आपली प्रतिक्रिया द्या