हिंदुस्थानचा शंभर नंबरी विजय, बाराबत्तीवर दक्षिण आफ्रिकेचा 13 षटकांतच खुर्दा

हिंदुस्थान 175 वर थांबला तेव्हा स्टेडियमवर चेहऱयावरचे भाव असे होते की, या धावा पुरणार आहेत का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता. पण ज्या धावा अपुऱया वाटत होत्या, त्या धावाच दक्षिण आफ्रिकेला ‘एव्हरेस्ट’सारख्या भासल्या आणि बाराबत्तीवर पाहुण्यांची बत्ती थेट 74 धावांत गुल झाली. 13 व्या षटकांतच टी-20 चा सामना संपला.

गेली दीड वर्षे टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या हिंदुस्थानने आजही त्याचीच झलक दाखवली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी लोळवत पाच सामन्यांच्या मालिकेची जोरदार विजयी फटाक्यांनी केली. टी-20 वर्ल्डकपच्या तयारीचा हा पहिलाच ट्रेलर म्हणायला हवा!

‘रनफेस्ट’चे तिकीट काढले,
‘विकेट शो’ पाहून घरी परतले!

कटकमध्ये आज धावांचा पाऊस पाहायला मिळेल, असे गृहीत धरून प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण इथे धावा नाही, विकेट्सच कोसळल्या. 176 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करमला पाहून चाहत्यांच्या काळजात धडधड वाढली होती. पण अर्शदीप सिंगने दुसर्याच चेंडूवर डी कॉकला पॅव्हेलियन दाखवला आणि संपूर्ण सामना ‘रिव्हर्स गिअर’मध्ये टाकला.

मारक्रम, स्टब्स आणि डेव्हिड मिलर हे तिन्ही ‘धडाकेबाज’ पन्नाशीतच गुंडाळले गेले तेव्हा सामना केवळ औपचारिकता बनला होता. पुढे सहाही गोलंदाजांनी हातात हात घालून 13व्या षटकात आफ्रिकेच्या ‘शॉपिंग मॉल’वर कुलूप ठोकले. कसोटी आणि वन डेत झुंजार खेळ करणार्या आफ्रिकेने टी-20 त प्रारंभीच निराशा केली.

अर्शदीप, बुमरा, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल – चौघांनी प्रत्येकी दोन-दोन बळी टिपत आफ्रिकन फलंदाजांना सपाटून तडाखे दिले. हार्दिक आणि शिवम दुबेने उरलेले काम सफाईने केले.

हार्दिकचे जोरदार कमबॅक

पहिल्या तीन फलंदाजांनी स्वस्तात माघार घेतल्यानंतर हिंदुस्थान ‘अडचणीत’ सापडला. गिल, अभिषेक, सूर्यकुमार तंबूत गेल्यावर पावणे दोनशे फार दूरच वाटत होते. तेव्हा तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी थोडेफार ऑक्सिजन देण्याचे काम केल, पण खरी सिलेंडर हार्दिक पंडयाने पुरवला.

अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरलेल्या हार्दिकने 28 चेंडूंत नाबाद 59 ठोकत गोलंदाजांना ‘धर्म’ शिकवला. चार षटकार, सहा चौकार आणि दणदणीत इराद्यामुळेच 175 धावा ‘कमी’ नव्हे तर ‘भरपूर’ ठरले. त्याची हीच खेळी सामनावीर ठरली. त्याआधी लुंगी एनगिडीने हिंदुस्थानची आघाडीची फळी उडवली खरी पण त्यांच्या फलंदाजांना rनिराशा केल्याने त्याची कामगिरी केवळ आकडेवारीत शोभत राहिली.