
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘डिजिटल इंडिया मोहिमे’अंतर्गत सध्या देशात मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञान विकास होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाची ही गती इतकी वेगाने होत आहे की याबाबतीत हिंदुस्थानने चीनला धोबीपछाड दिली आहे. तब्बल दुपटीने तंत्रज्ञान विकास साधत हिंदुस्थानने चीनलाही मागे टाकले आहे.
मॅकेन्झीच्या ‘डिजिटल इंडिया-टेक्नॉलॉजी टू ट्रान्सफॉर्म अ कनेक्टेड नेशन’ नाकाच्या अहवालात ही बाब नोंदवण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याच्या उपयुक्ततेच्या बाबतीत हिंदुस्थानच्या विकासाचा वेग हा चीनहून दुप्पट आहे. 2014 पासून ते आतापर्यंत हिंदुस्थानने 90 टक्के विकास केला असून चीन मात्र अद्याप 45 टक्क्यांवरच आहे. रोजच्या जगण्यातल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत हिंदुस्थानने रशिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना पिछाडीवर टाकले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये इंटरनेट डेटा स्वस्त झाल्यामुळे डेटा विक्री जवळपास 100 टक्क्यांनी वाढली आहे. ऑनलाइन व्यापारही वाढला असून सध्या हिंदुस्थानात 17.6 कोटी इतके ई-कॉमर्स उपभोक्ते आहेत.
या अहवालानुसार 2014 मध्ये इंटरनेट उपभोक्त्यांची संख्या 23.9 कोटी इतकी होती ती संख्या 2018 मध्ये दुपटीने काढून 56 कोटी इतकी झाली आहे. 2014 मध्ये एक व्यक्ती वर्षाकाठी 2.2 टक्के इतकाच कॅशलेस व्यवहार करत असे ती संख्या आता 2018 मध्ये 18 टक्के इतकी झाली आहे. त्याखेरीज स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यानुसार डेटाची मागणीही वाढताना दिसत आहे.

























































