
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह अनेक देशांतील उत्पादनांवर आयात शुल्क वाढविले आहे. त्याला आता हिंदुस्थानने जशास तसे उत्तर दिले आहे. अमेरिकेतून आयात केली जाणारी कडधान्ये, लोह आणि पोलाद यांच्यासह २९ उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार आयात करातील वाढ येत्या ४ ऑगस्टपासून लागू केली जाणार आहे.
अमेरिकन उद्योगाचे संरक्षण करण्याचे धोरण ट्रम्प यांनी स्वीकारले असून त्यांनी आयात करात जबर वाढ केल्यानंतर व्यापार युद्ध सुरू झाले आहे. युरोपियन युनियनने अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा आयात कर लागू करण्याचा निर्णय घेतला असून अशीच कृती चीननेही केली आहे.
यावर आयात शुल्क वाढविले
– अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार अमेरिकतून आयात झालेल्या हरभरा, मसूर डाळ, छोले यांच्यावर आता ३० टक्क्यांऐवजी ७० टक्के कर लागू होईल. मसूरवर ४० टक्के आयात कर लागू होणार आहे. पूर्वी तो ३० टक्के होता.
– अमेरिकन ड्रायफ्रूटवरही जादा आयात कर लागू होईल. यात कवचासहित बदामांवर प्रतिकिलो ३५ रुपयेऐवजी ४२ रुपये दर लागू होईल, तर बदामावर १०० रुपयांऐवजी १२० रुपये प्रतिकिलो दर आकारला जाईल. अख्ख्या अक्रोडवर ३० टक्क्यांऐवजी १२० टक्के, तर फोडलेल्या अक्रोडवर पूर्वीच्या ५० ऐवजी ७५ टक्के आयात कर लागू होईल.
ठळक वैशिष्ट्ये
– अमेरिकेने जेवढा आयात कर लागू केला आहे तेवढय़ाच रकमेचा आयात कर हिंदुस्थान अमेरिकेच्या उत्पादनांवर लागू करीत आहे.
– अमेरिकेने हिंदुस्थानच्या स्टील आणि ऍल्युमिनियम उत्पादनांवर २४१ दशलक्ष डॉलर्स इम्पोर्ट ड्युटी लागू केली होती.




























































