हीच का मोदी गॅरंटी… महागाईने गाठला 13 महिन्यांतील उच्चांक, अन्नपदार्थ कडाडले

पुढच्या तीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सवर जाईल तसेच 2030 पर्यंत सात लाख कोटी डॉलर्सचे लक्ष्य गाठेल, अशी गॅरंटी अर्थमंत्रालयाने नुकतीच आर्थिक पाहणी अहवालात दिली. परंतु, देशात महागाईने तब्बल 13 महिन्यांतील उच्चांक गाठल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. अन्नपदार्थ कडाडले असून दैनंदिन वापराच्या वस्तूही सर्वासामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे हीच का मोदी गॅरंटी, असा सवाल आता देशातील जनतेने केला आहे.

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकघरातील गॅस आणि वीजही महागली आहे. खाद्यान्नांसह भाज्याही महागल्याचे चित्र आहे. मार्च 2024 मध्ये घाऊक महागाईचा दर 0.53 टक्के होता तर एप्रिलमध्ये 1.26 टक्क्यांवर गेला.

– घाऊक बाजारातील सामानाच्या किमतींवरून घाऊक महागाईचा दर काढला जातो. घाऊक बाजारात खाद्यान्न, पेये यांची किंमत वाढल्यामुळे महागाई वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. वीज, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, पॅकिंगचे अन्न यांच्या किंमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

अशी वाढली महागाई

– मार्च महिन्यात महागाईचा दर 6.88 टक्के होता. एप्रिलमध्ये हाच दर 7.74 टक्क्यांवर गेला. एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर 23.60 टक्क्यांवर गेला. मार्च महिन्यात हाच दर 19.52 टक्के होता.
– मार्चमध्ये विजेचा महागाई दर -0.77 टक्के होता. एप्रिलमध्ये हाच दर 1.38 टक्क्यांवर गेला.
– मार्चमध्ये महागाईचा दर 4.85 टक्के होता. अन्नधान्य महागाईचा दर 8.52 टक्क्यांवरून 8.78 टक्क्यांवर पोहोचला.