
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला होता. जवळपास चार दिवस सुरू राहिलेल्या या संघर्षात दोन्ही बाजूने हल्ले चढवण्यात आले होते. या संघर्षानंतर प्रथमच हिंदुस्थानने पासिस्तानच्या मंत्र्यांना एका अधिकृत कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे मंत्री औरंगजेब खान खिची यांना हिंदुस्थानने आमंत्रित केले असून हा कार्यक्रम 20 आणि 21 नोव्हेंबर 2026 रोजी दिल्लीत होणार आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मे 2025 मध्ये जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्याला हिंदुस्थानकडून निमंत्रण मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी मे 2023मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी गोव्यात आले होते.
India invites all 10 SCO member nations, including Pakistan, for the inaugural Civilisational Dialogue Forum in New Delhi from November 20-22. https://t.co/YLSOMGfE75
— ANI (@ANI) October 28, 2026
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण आहेत. 2016 मध्ये पठाणकोट आणि उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. 2019मध्ये दोन्ही देशांनी आपापले राजदूत मायदेशी बोलावल्याने संबंध आणखी बिघडले. मात्र, एससीओसारख्या बहुपक्षीय संघटनांच्या माध्यमातून दोन्ही देशांना एकाच व्यासपीठावर सहभागी व्हावे लागते. हिंदुस्थानने एससीओच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे संघटनेतील सर्व सदस्य देशांना निमंत्रण देणे हिंदुस्थानसाठी आवश्यक आहे.
एससीओच्या सदस्य देशांमधील सांस्कृतिक संबंध दृढ करणे, लोकांमधील परस्पर संवाद वाढवणे आणि प्राचीन संस्कृतींचा सामायिक वारसा अधोरेखित करणे हा या मंचाचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये कला, साहित्य, परंपरा आणि विविध संस्कृतींच्या ऐतिहासिक संबंधांवर भर दिला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एखाद्या ऐतिहासिक वास्तूमध्ये हा कार्यक्रम होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2025 मध्ये चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत नागरी संस्कृतीविषयक संवाद मंचाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2026 रोजी ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे झालेल्या एससीओच्या सरकारप्रमुखांच्या 25 व्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची औपचारिक घोषणा केली.
एससीओमध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, चीन, रशिया, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश आहे. या संघटनेच्या माध्यमातून सदस्य देशांमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जातो. ऑक्टोबर 2024 मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एससीओच्या सरकारप्रमुखांच्या बैठकीसाठी इस्लामाबादला भेट दिली होती.























































