
वेस्ट इंडीजविरुद्ध लागोपाठ दहावी कसोटी मालिका जिंकण्यासाठी हिंदुस्थानला केवळ 58 धावांची गरज आहे. दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी झुंजार शतके झळकवत विंडीजमधील लढाऊ वृत्ती अजूनही असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे विजयासाठी पाचव्या दिवसापर्यंत वाट बघण्याची वेळ यजमानांवर आली. विंडीजकडून मिळालेल्या 121 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानने उर्वरित 18 षटकांत 1 बाद 61 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात 175 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैसवालला जोमेल वॉरिकनने फिलीपकरवी झेलबाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा के.एल. राहुल 25, तर साई सुदर्शन 30 धावांवर खेळत होते.
हिंदुस्थानने 5 बाद 518 धावांवर डाव घोषित केल्यानंतर विंडीजला 248 धावांवर रोखून पहिल्या डावात 270 धावांची मोठी आघाडी घेतली होती. विंडीजवर फॉलोऑन लादून अखंड 200 षटके गोलंदाजी करूनही हिंदुस्थानला डावाने विजय मिळविता आला नाही. वेस्ट इंडीजच्या शेवटच्या दोन गडय़ांनी पहिल्या डावात तब्बल 25.2 षटके झुंज दिली होती. हेच संकेत होते की, सामना सोपा जाणार नाही.
फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर वेस्ट इंडीजच्या जॉन कॅम्पबेलने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकवले, तर शाय होपने तब्बल आठ वर्षांनंतर शतकाची नोंद केली. शेवटच्या जोडीने तब्बल 79 धावांची भागीदारी करत 2025 मधील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी केली. वेस्ट इंडीजने तिसऱ्या दिवसाच्या 2 बाद 173 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. निर्जीव पिचवर 49 षटकांचा जुना चेंडू गोलंदाजांना काहीच साथ देत नव्हता. कॅम्पबेलने 87 वरून शतक पूर्ण केले आणि जाडेजाने गोलंदाजीचा अँगल बदलल्याने लगेच त्याला पायचीत पकडले. कॅम्पबेलने 199 चेंडूंत 115 धावा करताना 12 चौकारांसह 3 षटकार ठोकले. मग शाय होपनेही 214 चेंडूंच्या संयमी खेळीत 12 चौकार व 2 षटकारांसह 103 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडविला.
ग्रीव्हज-सिअल्स जोडीने झुंजविले
मधल्या फळीतील जस्टिन ग्रीव्हजने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून नाबाद 50 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराने शेवटच्या टप्प्यात जॉमेल वॉरिकन (3) आणि अँडरसन फिलिप (2) यांना बाद केले. मात्र, जस्टिन ग्रीव्हज आणि जेयडन सिअल्स या शेवटच्या जोडीने 79 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला चांगलेच तंगवले. शेवटी बुमराच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर सिअल्सला (32 धावा) सुंदरकरवी झेलबाद करून 118.5 षटकांत 390 धावसंख्येवर वेस्ट इंडीजचा डाव संपला. हिंदुस्थानकडून कुलदीप यादव व जसप्रीत बुमरा यांनी 3-3 फलंदाज बाद केले. मोहम्मद सिराजला 2 बळी मिळाले, तर रवींद्र जाडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी 1-1 गडी बाद केला.
नव्या चेंडूने गोलंदाजांना दिलासा
पाटा झालेल्या खेळपट्टीवर दुसऱया नवीन चेंडूने हिंदुस्थानी गोलंदाजांना काहीसा दिलासा दिला. 4 बाद 293 वरून वेस्ट इंडीजचा डाव 9 बाद 311 असा गडगडला. मोहम्मद सिराजने होपचा महत्त्वाचा बळीदेखील नवीन चेंडूवरच टिपला, तर कुलदीप यादवने पहिल्या डावातील पाच बळींसोबत दुसऱया डावातही तीन गडी झटपट बाद केले. त्याने टेविन इम्लाच (12), कर्णधार रोस्टन चेस (40) व खॅरी पिअरे (0) यांना बाद केले. नितीश कुमार रेड्डीला एकही षटक न देण्यामागचे कारण मात्र कळाले नाही.