
हिंदुस्थानचा पुरुषांचा हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हिंदुस्थानच्या हॉकी संघाने साखळी फेरीत पाचपैकी चार लढतींमध्ये शानदार विजय मिळवत 12 गुणांसह ए गटामध्ये दुसरे स्थान पटकावले. हिंदुस्थानने अखेरच्या लढतीत यजमान जपानला 5-3 अशा फरकाने धूळ चारली. हिंदुस्थानी संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला हे विशेष. ऑस्ट्रेलियाने ए गटामधून 13 गुणांसह पहिले स्थान कायम राखले.
हिंदुस्थानी हॉकी संघाने जपानविरुद्धच्या लढतीआधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या लढतीत त्यांच्यावरील दबाव कमी होता. गुर्जंत सिंगने 17व्या व 56व्या मिनिटाला गोल केले. हरमनप्रीत सिंगने 13व्या मिनिटाला, शमशेर सिंगने 34व्या मिनिटाला व नीलकांता शर्माने 51व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नवनीत कौरच्या गोलमुळे महिलांचे आव्हान कायम
हिंदुस्थानी महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमधील साखळी फेरीत सपाटून मार खावा लागत आहे. ए गटात सलग तीन पराभवांना सामोऱ्या गेलेल्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने शुक्रवारी आयर्लंडला 1-0 अशा फरकाने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. पहिल्या तिन्ही क्वॉटर्समध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अखेरच्या क्वॉटरमध्ये नवनीत कौरने आयर्लंडचा बचाव भेदला आणि हिंदुस्थानी हॉकीप्रेमींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. 57व्या मिनिटाला हिंदुस्थानी संघाने गोल करीत विजय साकारला.



























































