परदेशातील कोरोना व्हेरिएंटच्या शोधासाठी ‘एस-जिन’ तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशातील कोरोना व्हेरिएंटच्या शोधासाठी पालिका आता ‘एस-जिन’ तंत्रज्ञानाने तपासणी करणार आहे. यामध्ये हिंदुस्थानाबाहेर आढळलेल्या नव्या विषाणूची माहिती मिळणार आहे. नवा विषाणू असल्याचे समोर आल्यास जिनोम सिक्वेंसिंग टेस्ट केल्यानंतर व्हेरिएंटचा शोध लागणार आहे. त्यामुळे उपचार आणि पुढील उपाययोजना करता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यात सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात असला तरी दक्षिण आफ्रिका आणि काही युरोपीय देशांमध्ये आलेल्या ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे पालिकेच्या माध्यमातून खबरदारी घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन पॉझिटिव्ह आढळल्यांच्या निकट संपर्कातील लोकांचाही शोध घेतला जात आहे. यासाठी पालिकेचा वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाकडून अशा प्रवाशांना संपर्क करण्यात येत आहे. ‘एस-जिन’ तंत्रज्ञानातून स्वॅब घेऊन चाचणी केली जाणार आहे.

466 मध्ये मुंबईचे फक्त 100 प्रवासी

मुंबईत पालिकेकडे आलेल्या गेल्या 15 दिवसांच्या आकडेवारीनुसार 466 प्रवासी विमानाने मुंबईत आलेले आहेत. यातील फक्त 100 प्रवासी मुंबईतील असून इतर प्रवासी राज्याच्या इतर भागातील असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत परदेशातून आलेल्या 100 जणांचा संपर्क झाला असून सर्वांची पुन्हा टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेंसिंग करणार असून क्लोज काँटॅक्टचीही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.