हिंदुस्थानचा शेवटचा किल्लाही ढासळला, इंडिया ओपनमध्ये लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत धक्का

इंडिया ओपन  बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले. पुरुष एकेरीतून अखेरची आशा असलेला लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने हिंदुस्थानला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आता उपांत्य फेरीत पॅनेडियन विक्टर लाय आणि चिनी तैपेईचा लिन चुन-यी, इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती आणि सिंगापूरच्या लोह किन यू यांच्यात झुंज रंगेल.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय संकुलात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लक्ष्य सेनला चायनीज तैपेईच्या लिन चुन-यीकडून तीन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिला गेम लक्ष्यने जिंकला, मात्र दुसऱया गेममध्ये प्रतिस्पर्ध्याने जोरदार पुनरागमन करत सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. तिसऱया गेममध्ये 18-18 अशी बरोबरी असताना लिन चुन-यीने सलग गुण मिळवत सामना जिंकला आणि लक्ष्यनं स्पर्धेतून एक्झिट घेतली.

या पराभवामुळे इंडिया ओपनमधील हिंदुस्थानचा शेवटचा किल्ला ढासळला. याआधीच पुरुष दुहेरीतील सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तसेच महिला दुहेरीतील त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे आव्हान संपले होते. महिला एकेरीत मालविका बन्सोड बाहेर पडली होती, तर पी. व्ही. सिंधू आणि तन्वी शर्मा यांनाही पहिल्याच टप्प्यात माघार घ्यावी लागली होती.

संपूर्ण स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी झुंजार लढत दिली, मात्र निर्णायक क्षणी सातत्य राखण्यात अपयश आले. परिणामी, घरच्या मैदानावर होणाऱया प्रतिष्ठsच्या इंडिया ओपन स्पर्धेत हिंदुस्थानला पदकांशिवाय समाधान मानावे लागले आहे. आता हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू पुढील आव्हानासाठी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करणार असून इंडिया ओपनमधील अपयशातून धडा घेत जोरदार पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे.