
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) नेहमीच कुरापती काढत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करू असे पुन्हा आश्वासन दिले आहे. यासंदर्भात हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लष्कराने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.
दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांच्यामध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली. त्यानंतर सीमेवर शांतता राहावी. गोळीबाराच्या घटना घडू नयेत यावर एकमत झाले. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये 2003 साली झालेल्या शस्त्रसंधी कराराचे काटेकोर पालन केले जाईल. सीमेवर गोळीबार करून या कराराचे उल्लंघन करण्यात येणार नाही. ‘एलओसी’वर काही तणाव निर्माण झाल्यास दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्ग काढला जाईल. त्यासाठी फ्लॅग मीटिंग घेतल्या जातील असेही या निवेदनात म्हटले आहे. याची अंमलबजावणी आजपासूनच तत्काळ सुरू करण्यात आली आहे.
शेजारील देशांबरोबर, पाकिस्तानबरोबरचे संबंध शांततापूर्ण असावेत अशी हिंदुस्थानची भूमिका आहे. 2003 च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करण्यावर एकमत झाले. दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओ’ यांच्यात चांगल्या वातावरणात चर्चा झाली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.
सीमेवर शांतता राहावी अशी हिंदुस्थानची भूमिका आहे. मात्र जम्मू-कश्मीरात दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहणार. तसेच सीमेवरील लष्कराचे मनुष्यबळ कमी केले जाणार नाही. देशांच्या सीमांच्या रक्षणासाठी हे मनुष्यबळ कायम राहील असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.


























































