जवान शहीद होतायत आणि तुम्ही पाकिस्तानसोबत सामने खेळणार? ओवेसींची मोदींना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा जम्मू-कश्मीरमध्ये असंतोष धुमसायला लागला आहे. दहशतवाद्यांचे हल्ले वाढले असून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची हत्या करायला सुरुवात केली आहे. एकीकडे हिंदुस्थानात हे सगळं होत असताना दुसरीकडे दुबईमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे. 24 ऑक्टोबरला हा सामना होणार असून या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला आहे. भाजपचे गिरीराज सिंह, बिहारचे उमपमुख्यमंत्री आणि भाजप नेते तारकिशोर प्रसाद यांनी या सामन्याला विरोध केला आहे. त्यांच्यापाठोपाठ एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या सामन्याला विरोध केला आहे. 9 जवान शहीद झाले असताना तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळणार आहात का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

ओवेसी यांनी हैदराबाद इथे एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरही काही बोलत नाहीत आणि महागाईवरही ते काही बोलत नाही असे ओवेसी यांनी म्हटलं. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की पेट्रोल-डिझेलची सेंच्युरी झाली तरीही पंतप्रधान म्हणतात ‘फिकर मत करो’. एमआयएमच्या ओवेसी यांनी मोदींवर टीका करताना पुढे म्हटले की पंतप्रधान मोदी चीनबाबत बोलण्यास घाबरतात. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला ‘घरमे घुसके मारेंगे’ म्हणणारे मोदी चीनबाबत काहीच करत नाही असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे. हिंदुस्थानचे 9 जवान मारले तरी तुम्ही पाकिस्तानसोबत टी20 सामना खेळणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाकिस्तान कश्मीरात लोकांच्या जीवाशी टी20खेळतोय, गुप्तचर यंत्रणा, अमित शहा काय करतायत ? असंही ओवेसी म्हणाले .