हिंदुस्थानी संशोधकांनी शोधला एन-95 मास्कला पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी जगभरात एन-95 मास्क संसर्ग रोखायला अतिशय योग्य मानला जात आहे. मात्र सध्या उपलब्ध एन-95 मास्क हे वापरासाठी अडचणीचे ठरतात. अनेक मास्कमधून वापरणाऱया व्यक्तीस श्वास घेणेही कठीण जात आहे. यावर उपाय म्हणून आता हिंदुस्थानी संशोधकांनी हायब्रिड मल्टिप्लाय फेसमास्क विकसित केला आहे. सुती कापडापासून बनवलेला हा द्विस्तरीय मास्क 90 टक्के धूलिकण आणि 99 टक्के विषाणूंना रोखण्यात सक्षम असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

हैदराबादस्थित परिशोधन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडने जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (बायरेक) आणि आयकेपी नॉलेज पार्कच्या मदतीने हायब्रिड मल्टिप्लाय मास्क विकसित केला आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखणे आणि तो वापरणाऱया व्यक्तीस तो त्रासदायक ठरू नये यासाठी नवा सुधारित एसएचजी -95ची (बिलियन सोशल मास्क) निर्मिती करण्यात आली आहे. सुती कापडापासून बनवलेल्या या मास्कचा आतून तलम अस्तर असल्याने या मास्कमधून श्वास घेणे सोपे होणार आहे.

धूलिकण व विषाणूंना रोखण्यात सक्षम

हायब्रिड मल्टिप्लाय मास्क स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येणार आहे. शिवाय मास्क कानाला बांधण्याचे लूपही नरम असल्याने त्यांचा कानाला त्रास होणार नाही. हा ‘मेड इन इंडिया’ मास्क व्यक्तीला 90 टक्के धूलिकण आणि 99 टक्के विषाणूंपासून संरक्षण देणारा असल्याने त्याची आतापर्यंत मोठी विक्रीही झाली आहे. विशेष म्हणजे या मास्कच्या निर्मितीसाठी कॅनडाच्या ‘ग्रॅण्ड चॅलेंजेस’ या संस्थेनेही सहकार्य केले आहे.