
हिंदुस्थानविरोधात नेहमीच गरळ ओकणाऱ्या पाकड्यांनी संयुक्त राष्ट्रापुढे पुन्हा एकदा पाच खोटे दावे केले. मात्र संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानी मिशनने लागलीच पाकड्यांच्या खोटारडेपणाचे पितळ उघडे पाडून सर्व दाव्यांचे जोरदार खंडन केले. हिंदुस्थानने आपल्याविरोधात भाडोत्री दहशतवादी ठेवलेत, अशी बोंब पाकिस्तानी मिशनने मारली होती. मात्र हा दावा अत्यंत हास्यास्पद असल्याचे हिंदुस्थानी मिशनने ट्विटद्वारे स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानविरोधात काही दावे केले. मात्र आम्हाला हे कळत नाही की पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीने आपले मुद्दे नेमके कुठे मांडले? कारण पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य नाही. तसेच परिषदेचे सत्र हे आज बिगर सदस्यांसाठी खुलेच नव्हते, असे स्पष्ट करीत हिंदुस्थानी मिशनने संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी मिशनला तोंडघशी पाडले. पाकिस्तानचे पाचही दावे खोटे ठरवले. पाकिस्तान गेली कित्येक दशके सीमेपलिकडील दहशतवादाने त्रस्त आहे, असा दावा पाकिस्तानी मिशनने केला. त्यावर खोटे शंभरवेळा बोलून ते खरे होत नाही. मुळात हिंदुस्थानविरोधातील दहशतवादाचा पाकिस्तान हाच सर्वात मोठा स्पॉन्सर आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानी मिशनने चोख उत्तर दिले.


























































