हिंदुस्थानचे सात बॉक्सर उपांत्य फेरीत, जागतिक युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतील हिंदुस्थानी खेळाडूंची दमदार वाटचाल सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी हिंदुस्थानच्या सात खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून हिंदुस्थानसाठी आपली पदके पक्की केली. बेबीरोजिसना चानू हिने युरोपियन चॅम्पियन एलेक्सा कुबिका हिचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली.

बेबीरोजिसाना (51 किलो) हिच्यासह अरुंधती चौधरी (69 किलो), सनामचा चानू (75 किलो), अंकित नरवाल (64 किलो), विशाल गुप्ता (91 किलो), विश्वामित्र चोंगथम (49 किलो) व सचिन (56 किलो) या हिंदुस्थानी बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना हरवले. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी चार, तर सातव्या दिवशी 7 खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठल्याने हिंदुस्थानचे एकूण 11 पदके पक्के झाली आहेत. सहाव्या दिवशी विंकी, अल्फिया पठाण, गीतिका व पूनम यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

बेबीरोजिसना चानू हिने 51 किलो गटात यजमान पोलंडच्या कुबिकाचा 5-0 गुणफरकाने धुव्वा उडवला. उपांत्य लढतीत तिचा सामना इटलीच्या लुसिया अयारी हिच्याशी होईल. अरुंधती चौधरीने यूव्रेनच्या अन्ना सेजको हिचा 5-0 गुणफरकाने पाडाव केला. सनामचा चानू हिने सुरुवातीपासूनच रशियाच्या मार्गरिटा जुएवा हिच्यावर वर्चस्व गाजवल्याने दुसऱया फेरीतच तिला विजयी घोषित करण्यात आले.

पुरुष गटात आशियाई ज्युनियर चॅम्पियन विश्वामित्र चोंगथम व एशियाई युवा चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेत्या अंकित नरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना 5-0 फरकाने धूळ चारली.

मात्र मनीष (75 किलो) व सुमित (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानच्या सात महिला बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल झाल्याने हिंदुस्थान गुणतालिकेत रशियासह अव्वल स्थानावर आहे. पुरुषांमध्ये चार खेळाडू उपांत्य फेरीत दाखल झाल्याने हिंदुस्थान गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या