निवड समितीची होलसेल संघ निवड, दक्षिण आफ्रिकेच्या 28 दिवसांच्या दौऱ्यासाठी 31 खेळाडूंची निवड

आगामी दक्षिण आफ्रिकेच्या आगामी 28 दिवसांच्या दौऱ्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या निवड समितीने होलसेलमध्ये चक्क 31 खेळाडूंची निवड करून ‘सबको मौका मिलेगा’चे आश्वासन दिलेय. हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात एका दौऱ्यासाठी जम्बो संघाची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. या जम्बो संघाबाबत सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलेय.

दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत चाललेल्या क्रिकेटमुळे खेळाडूंना सर्व क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि फॉरमॅटमध्ये खेळणे कठीण होत चाललेय. सातत्याने सुरू असलेल्या क्रिकेटमुळे खेळाडूंच्या दुखापतीतही तितक्याच वेगाने वाढही होतेय. त्यामुळे आगामी महत्त्वाच्या मालिकांच्या तयारीसाठी संघातील दुखापतींचे प्रमाण कमी व्हावे आणि जास्तीत जास्त खेळाडूंना खेळता यावे म्हणून निवड समितीने 31 खेळाडूंचा जम्बो संघ निवडून ‘रामबाण उपाय’ शोधला आहे. मात्र या जम्बो निवडीमुळे हा दौरा निव्वळ टाइमपास असल्याचीही टीका आता होऊ लागलीय.

हिंदुस्थानी संघाचे आतापर्यंत शेकडो दौरे दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधींचे झालेत. त्या दौऱ्यांवरही निवड समितीने इतक्या जम्बो संघाची निवड कधीही केली नव्हती, पण यंदा निवड समितीने जबरदस्त शक्कल लढवत हिंदुस्थानच्या तिन्ही फॉरमॅटमधील जवळजवळ सर्वच खेळाडूंना एकाच दौऱ्यासाठी निवडण्याचा पराक्रम केला आहे.

जम्बो संघामुळे बोलती बंद

एखादा संघ जाहीर केला की, या खेळाडूवर अन्याय झाला, त्या खेळाडूची पात्रता नसतानाही निवडण्यात आले, अशी बोंब ठोकली जायची, पण आता अशी बोंबाबोंब होणार नाही. प्रत्येक फॉरमॅटसाठी कर्णधार आणि उपकर्णधार वेगवेगळे देण्याचा प्रकार करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर तिन्ही क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाची जबाबदारी भिन्न खेळाडूंवर सोपविण्यात आली आहे. केवळ ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडूच तिन्ही फॉरमॅटमध्ये आहेत. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा हे सात खेळाडू फक्त कसोटीतच खेळणार आहेत. ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि दीपक चहर हे सात खेळाडू वन डे आणि टी-20 मध्ये खेळतील.