मुद्दा : हिंदुस्थानातील स्टेशनरी व्यवसायाचा विकास

761

>> शैलेंद्र गाला

स्टेशनरी उद्योग हा शाळा, महाविद्यालये व कार्यालये अशा वेगवेगळ्या स्तरांवर स्टेशनरी पुरवणारा मिश्र व्यावसायिक गट आहे. कागदी (वह्या, लाँग बुक, स्पायरल बुक) व कागदेतर स्टेशनरी (पेन्सिल, पेन, रंग) अशा दोन्ही प्रकारच्या स्टेशनरींचा या व्यवसायात अंतर्भाव होतो. सतत वेगवेगळय़ा ढंगात, आकर्षक पद्धतीने नवनवीन उत्पादने बाजारात आणत, चांगल्या वेगाने या उद्योगाची वाटचाल सुरू आहे. साक्षरता दरामध्ये झालेली वाढ, झपाटय़ाने वाढणाऱया खासगी शाळा व इतर संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेसची वाढती संख्या, मुलांमध्ये करण्यात आलेली जागृती, नवनवीन आकर्षक सवलत योजना आणि इतर घटकांचा या यशोगाथेत वाटा आहे.

शैक्षणिक कागदी स्टेशनरीची उलाढाल अंदाजे 5000 कोटी असून कागदेतर स्टेशनरीचीही साधारणपणे तेवढीच (त्यातील केवळ पेनांची विक्री 2500 कोटी) उलाढाल आहे. ग्राहकांच्या वयोगटानुसार वेगवेगळय़ा उत्पादनांचा पुरवठा केला जातो. उदा. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना रंगांची वैविध्यपूर्ण उत्पादने, उच्च शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाँग बुक्स, पेन, गणितीय उपकरणे इत्यादी; तर कार्यालयीन कामकाजासाठी दैनंदिनी, नोंदवह्या, स्टेपलर्स इत्यादी. प्रत्येक बाजारपेठेतील स्टेशनरीची मागणी व वापर भिन्न असतो. कारण बऱयाचदा तेथील शाळा व स्थानिक शैक्षणिक संस्थांच्या गरजेनुसार व शैक्षणिक परंपरेनुसार स्टेशनरीची मागणी केली जाते. कागदी स्टेशनरीमध्ये स्थानिक आणि ब्रँडेड उत्पादने यांमध्ये स्थानिक उत्पादकांचा वरचष्मा आहे आणि त्याचे प्रमाण 70ः30 असे आहे; परंतु कागदेतर स्टेशनरी उत्पादनांमध्ये हेच प्रमाण अधिकृत राष्ट्रीय ब्रँडच्या बाजूने झुकते माप दाखवणारे आहे.

प्रत्येक प्रकारच्या उत्पादनाचा अंतिम ग्राहक, त्यावर प्रभाव टाकणारे घटक आणि खरेदीदार बऱयाचदा विभिन्न असतात. पूर्वी आपल्या पाल्याने कोणत्या ब्रँडची स्टेशनरी वापरावी, कोणत्या डिझाइनची वही वापरावी यावर पालकांचा प्रभाव असे व पालकच खरेदीदार असत. परंतु आता मुले स्टेशनरीविषयी आग्रही असतात आणि कोणती स्टेशनरी वापरायची हे मुले स्वतःच ठरवतात. तरुणांना तर नित्य नावीन्याची आस असते. त्यामुळे आता वह्या पूर्वीप्रमाणे साध्या न राहता त्यात आकर्षक मुखपृष्ठs, सेल्फी अपलोड ऑप्शन आणि वेगवेगळे आकर्षक पोत असलेल्या कव्हर्सचे पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक आणि कला शिक्षकांचाही स्टेशनरी उत्पादनाच्या विक्रीवर प्रभाव जाणवत आहे. ते अमुक प्रकारची, अमुक ब्रँडची स्टेशनरी शाळेत वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना सुचवतात. स्टेशनरी उत्पादनांच्या जगतात डिजिटल उत्पादनांच्या झालेल्या प्रवेशामुळे स्टेशनरीच्या खरेदीवर आणि त्याच्या वापरावर प्रभाव टाकणारे आणि त्यांचे पुनरावलोकन करणारे नवीन घटक उदयाला आले आहेत.

जसजसे ग्राहक अधिकाधिक सजग होत आहेत, विकसित होत आहेत, तसतसे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार कागद, सुटसुटीत आकर्षक डिझाइन्स, उत्तम दर्जाचे आणि वैविध्यपूर्ण रंग, रंगीत खडू, पर्यावरणस्नेही घटक वापरून तयार केलेली उत्पादने दिवसेंदिवस अतिशय लोकप्रिय होत आहेत. कमी किमतीच्या हलक्या दर्जाच्या वस्तू वापरण्यापेक्षा थोडे जास्त दाम मोजून उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याकडे हिंदुस्थानी ग्राहकांचा कल वाढतो आहे. पूर्वी दर्जेदार ब्रँडविषयी ग्राहक व विक्रेते यांमध्ये असलेली अनभिज्ञता हा या व्यवसायाच्या विस्तारातील मोठा अडथळा होता; परंतु आता दर्जेदार ब्रँडच्या उत्पादनांबाबत ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम व्यावसायिक कौशल्ये वापरून, विशेषतः डिजिटल माध्यमांचा प्रभावी उपयोग करून जाणीवपूर्वक केले जात आहे. आज या व्यवसायाला उत्तम स्थैर्य प्राप्त झाले आहे आणि त्याची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू आहे.

साहजिकच, स्टेशनरी उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या संपर्क माध्यमांमध्येही आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. आजचे ब्रँड आपली उत्पादने ग्राहकांचे अंतिम समाधान आणि त्यांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात उमटेल, अशा पद्धतीने आणि अशा वैशिष्टय़ांनुसार सादर करताना दिसत आहेत.

(संचालक, नवनीत एज्युकेशन लिमिटेड)

आपली प्रतिक्रिया द्या