शरत अन् मनिकाकडे टेबल टेनिस संघाचे नेतृत्व, पॅरिस ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानचा टेबल टेनिस संघ जाहीर

शरत कमल व मनिका बत्रा या अनुभवी खेळाडूंकडे पॅरिस ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या अनुक्रमे पुरुष व महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. हिंदुस्थान टेबल टेनिस महासंघाने (टीटीएफआय) गुरुवारी सहा सदस्यीय (पुरुष व महिला संघ प्रत्येकी 3 खेळाडू) हिंदुस्थानी टेबल टेनिस संघांची घोषणा केली. यावेळी ऑलिम्पिकसाठी एकेरीतील खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली. ऑलिम्पिकच्या इतिहासात यंदा प्रथमच हिंदुस्थानी टेबल टेनिसपटू टीम इव्हेंटमध्ये सहभागी होत आहेत, हे विशेष.

शरत कमलसह हरमीत देसाई व मानव ठक्कर यांनी तीन सदस्यीय हिंदुस्थानी संघात स्थान मिळेल, तर मनिका बत्रा, श्रीजा अकुला व अर्चना कामथ महिला संघातील सदस्य असतील. पुरुष संघात जी. साथीयान व महिला संघात आयहिका मुखर्जी यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. याचबरोबर पुरुष एकेरीत शरत व हरमीत, तर महिला एकेरीत मनिका व श्रीजा हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील. ताज्या क्रमवारीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 2004च्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱया 41 वर्षीय शरथ कमलची ही पाचवी व अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असेल. जी साथीयान व आयहिका मुखर्जी हे राखीव खेळाडू पॅरिसला जातील, पण त्यांना ऑलिम्पिक क्रीडा ग्राममध्ये प्रवेश मिळणार नाही. संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्यांना क्रीडा ग्राममध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल.