हिंदुस्थानच्या ‘शौर्य’मुळे शत्रुला फुटणार घाम! क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने शौर्य या नवीन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे नवीन पद्धतीने बनवलेलं क्षेपणास्त्र वजनाला हलकं असून वापरण्याच्या दृष्टीने अतिशय सोपं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे क्षेपणास्त्र 800 किलोमीटर दूरवरचं लक्ष्य भेदू शकतं. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राचं जमिनीवरील रूप आहे. टू स्टेज रॉकेट पद्धतीचं शौर्य 40 किमीपर्यंत उंच जाऊन मग लक्ष्याचा वेध घेतं.

शौर्यचा वेग इतका प्रचंड आहे की सीमाभागात शत्रुच्या रडारवर हे दिसून येईपर्यंत त्याने लक्षाचा वेध घेतलेला असेल. अवघ्या 400 सेकंदांत शत्रुचे तळ उद्ध्वस्त करू शकेल, इतका प्रचंड वेग या क्षेपणास्त्राचा आहे. हे क्षेपणास्त्र वजनाला हलके तसेच अशा संरचनेचे बनलेले आहे की, एका ठिकाणाहून दुसरीकडे लपवून नेले जाऊ शकेल. हे मिसाईल सॉलिड फ्युअलवर चालतं पण एखाद्या क्रुझ मिसाईलप्रमाणे स्वतःच लक्ष्यापर्यंतचा माग काढू शकतं.

गेल्या काही दिवसांत हिंदुस्थानने संरक्षण क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात पिनाक रॉकेट्स, लॉन्चर्स आणि गरजेच्या उपकरणांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.