
आर्थिक विकासाच्या दृष्टीने वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये प्रदूषणही झपाट्याने वाढत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा समृद्धपण प्रदूषित शहरांनी जगाची चिंता वाढवली असून हिंदुस्थानातील शहरे याप्रकारात आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘नेचर सिटीज’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार हिंदुस्थानातील अनेक शहरांची आर्थिक प्रगती अजूनही जीवाश्म इंधन जसे की कोळसा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी यावर आधारित आहे. तर दुसरीकडे चीनसह अनेक देशांनी स्वच्छ नागरिकरणाच्या दिशेने मोठी आघाडी घेतल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
2019 ते 2024 या कालावधीत जगभरातील 5,435 शहरांचा उपग्रहाद्वारे नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) पातळी आणि शहरांच्या जीडीपीच्या आधारे अभ्यास करण्यात आला. NO2 हा प्रदूषक प्रामुख्याने वाहनांमधून, उद्योगांमधून आणि औष्णिक वीज प्रकल्पांमधून होणाऱ्या पेट्रोल डिझेलवरील इंधन ज्वलनाशी संबंधित मानला जातो.
या अभ्यासात शहरांचे चार गट करण्यात आले. त्यामध्ये ‘स्वच्छ आणि समृद्ध’, ‘प्रदूषित पण समृद्ध’, ‘स्वच्छ पण गरीब’ आणि ‘प्रदूषित व गरीब’ अशा वर्गवारीचा समावेश होता. जगातील सुमारे 80 टक्के शहरांनी ‘स्वच्छ आणि समृद्ध’ या गटात स्थान मिळवले. म्हणजे आर्थिक वाढ होत असताना प्रदूषण कमी करण्यात या शहरांना यश आले आहे. पूर्व आशिया, पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक शहरांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
मात्र हिंदुस्थानातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले. अभ्यासात समाविष्ट असलेल्या 902 हिंदुस्थानी शहरांपैकी 15.3 टक्के शहरांमध्ये 2019 ते 2024 या काळात NO2 प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले.
जगभरातील ‘प्रदूषित पण समृद्ध’ या गटातील 390 शहरांपैकी तब्बल 138 शहरे हिंदुस्थानातील असून हे प्रमाण जवळपास 35.4 टक्के आहे. कोणत्याही एका देशासाठी हे सर्वाधिक प्रमाण ठरले आहे. या शहरांमध्ये आर्थिक प्रगती होत असली तरी प्रदूषणही त्याच वेगाने वाढत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांनी तुलनेने स्वच्छ वाढीचा कल दाखवला असला तरी अनेक शहरे अजूनही वाहनांवर आधारित वाहतूक व्यवस्था, प्रदूषणकारी उद्योग, शहरी विस्तार आणि कोळशावर आधारित वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
या ‘प्रदूषित पण समृद्ध’ शहरांच्या जागतिक पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘प्रदूषित आणि गरीब’ या सर्वात चिंताजनक गटातही काही हिंदुस्थानी शहरांचा समावेश असल्याचे संशोधकांनी नमूद केले. या गटातील शहरांमध्ये स्थानिक अर्थव्यवस्था कमजोर होत असतानाही प्रदूषण वाढत असल्याचे दिसून आले.
दुसरीकडे चीनने स्वच्छ नागरीकरणात मोठी झेप घेतली आहे. ‘स्वच्छ आणि समृद्ध’ या गटात चीनमधील तब्बल 719 शहरांचा समावेश झाला. बीजिंग, शांघाय, ग्वांगझोउ आणि चेंगडू यांसारख्या शहरांनी आर्थिक प्रगतीसोबत NO2 प्रदूषणात घट नोंदवली आहे. यामागे कठोर पर्यावरणीय नियम, उद्योगांवरील नियंत्रण, प्रदूषणकारी उद्योगांचे स्थलांतर आणि सार्वजनिक वाहतुकीचे वेगाने विद्युतीकरण ही प्रमुख कारणे असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
शहरे आर्थिकदृष्ट्या प्रगत होत असताना ती स्वच्छ राहतील की अधिक प्रदूषित बनतील हे मोठ्या प्रमाणात प्रशासनाची गुणवत्ता, पर्यावरणीय धोरणे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर अवलंबून असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.



























































