
हिंदुस्थानी संघाने 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 7 गडी आणि 117 चेंडू राखून धुव्वा उडवित धडाकेबाज विजयारंभ केला. हेनिल पटेल (3 गडी), किशन कुमार व कौशिक चौहान (प्रत्येकी 2 गडी) यांची अचूक गोलंदाजी आणि अभिज्ञान कुंडू (नाबाद 87) व वेदांत त्रिवेदी (नाबाद 61) यांची दणकेबाज नाबाद अर्धशतकी खेळी ही युवा टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.
युवा ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 226 धावांचे माफक लक्ष हिंदुस्थानच्या युवा संघाने 30.3 षटकांत 3 बाद 227 धावा करीत सहज पूर्ण केले. आयपीएल फेम वैभव सूर्यवंशीने 22 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह 38 धावांची धडाकेबाज खेळी करीत हिंदुस्थानला खास आपल्या शैलीत सुरुवात करून दिली. हेडन शिलरने सहाव्या षटकात वैभवला आर्यन शर्माकरवी झेलबाद केले. त्यानंतर चार्ल्स लॅचमूंडने कर्णधार आयुष म्हात्रे (6) व विहान मल्होत्रा (9) यांना लवकर बाद झाल्याने हिंदुस्थानची 3 बाद 75 अशी स्थिती झाली.
ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचा फ्लॉप शो
यानंतर स्टीव्हन होगन (39) व विल मलाझचुक (17) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र हेनिल पटेलने या दोघांना बाद करत पुन्हा ऑस्ट्रेलियाला दबावाखाली आणले. मधल्या फळीत टॉम होगन (40), आर्यन शर्मा (10), हेडन शिलर (9) व बेन गॉर्डन (16) धावा करून माघारी परतले. अखेर जॉन जेम्सने 68 चेंडूंत 6 चौकार व एक षटकारासह नाबाद 77 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाला 9 बाद 225 धावांपर्यंत पोहोचविले. हिंदुस्थानकडून हेनिल पटेलने 3, तर किशन कुमार व कौशिक चौहान यांनी प्रत्येकी 2 विकेट टिपले. अम्ब्रिशला 1 बळी मिळाला.
किशन कुमारचा डबल धमाका
त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र किशन कुमारने ऍलेक्स टर्नर व सायमन बज या दोन्ही सलामीवीरांना पहिल्याच षटकात भोपळाही फोडू न देता बाद करीत हिंदुस्थानला खळबळजनक सुरुवात करून दिली. किशनच्या या डबल धमाक्याच्या धक्क्यातून ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजांना पुन्हा सावरता आले नाही.
वेदांत, अभिज्ञानची दीडशतकी भागीदारी
त्यानंतर वेदांत त्रिवेदी व अभिज्ञान कुंडू या मधल्या फळीतील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या जोडीने हिंदुस्थानला 30.3 षटकांत 227 धावांपर्यंत पोहोचवत सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले. अभिज्ञानने केवळ 74 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 87 धावा केल्या, तर वेदांतने 69 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा झळकावल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 152 धावांची अभेद्य भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून चार्ल्स लॅचमुंडने 2 गडी बाद केले, तर हेडन शिलरने 1 गडी बाद केला.