
सलामीवीर यशस्वी जैसवालचे हमखास शतक अवघ्या 13 धावांनी हुकताच सारे चुकचुकले होते. मात्र दिवसअखेरीस कर्णधार शुभमन गिलने त्याची भरपाई करताना इंग्लंडविरुद्ध सलग तिसऱया कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या शतकामुळे हिंदुस्थानने दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 5 बाद 310 अशी दमदार मजल मारलीय. खेळ थांबला तेव्हा गिल 114 तर रवींद्र जाडेजा 41 धावांवर खेळत होता. एजबॅस्टनचा इतिहास बदलायचा असेल तर हिंदुस्थानच्या मधल्या फळीला 500 धावांचा टप्पा गाठणे बंधनकारक असेल. अन्यथा मालिकेत हिंदुस्थानची काही खैर नसेल.
टॉस आजही इंग्लंडच्या बाजूनेच पडला आणि बेन स्टोक्सने वेळ न दवडता हिंदुस्थानी फलंदाजांना आमंत्रण दिले. संघात तीन बदल असले तरी सलामीला जैसवाल आणि राहुल हीच यशस्वी जोडी मैदानात उतरली. पण आज ही जोडी यशस्वी सलामी देऊ शकली नाही. दोघांनी नऊ षटके किल्ला लढवला. गेल्या डावांत दमदार खेळी करणारा राहुल आज चाचपडला आणि 38 मिनिटांत केवळ 2 धावा करून ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीसमोर शरणागत गेला.
साई सुदर्शनला पदार्पणाची संधी देऊन आज बसवण्यात आल्यामुळे करुण नायरला आणखी एक संधी लाभली; पण नायर आजही आपल्या बॅटीत असलेले फायर दाखवू शकला नाही. त्याने जैसवालसह 80 धावंची भागी रचून पहिले सत्र चांगले खेळून काढले. पण उपाहाराला पाच मिनिटे असताना ब्रायडन कार्सने त्याची विकेट काढली. हा हिंदुस्थानसाठी एक धक्काच होता.
यशस्वी चुकचुकला
यशस्वीला आज आपल्या शतकाने अनेक विक्रमांना मागे टाकण्याची संधी होती. तो 39 व्या आपल्या डावात वेगवान 2000 कसोटी धावांचा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार असेच साऱयांना वाटत होते. त्याचा धडाकेबाज खेळ पाहून प्रेक्षक बेहद्द खूश होते. पण 87 धावांवर त्याने स्टोक्ससमोर आपले संतुलन गमावले आणि विक्रमाची संधीही गमावली. तो चक्क 87 धावांवर बाद झाला. फक्त 107 चेंडूंत त्याने 13 खणखणीत चौकारांसह ही खेळी साकारली होती. बाद झाला आणि त्याचा कसोटी धावांचा आकडा 1990 धावांवर अडखळला. आता दुसऱया डावात त्याने 10 धावा केल्या तरी तो राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडू शकणार नाही. या दोघांनीही 40 डावांत 2 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता आणि यशस्वीने 10 धावा केल्या तर तोसुद्धा यांच्या पंक्तीत स्थान मिळवेल.
त्याआधी यशस्वीने शुभमन गिलसह 66 धावांची भागी रचली. या जोडीकडून शतकी भागीची अपेक्षा होती; पण यशस्वीच्या धावांच्या मोहाने ही संधी गमावली. त्यानंतर गिलने पंतच्या साथीने 47 धावा केल्या. पंतनेही चुकीच्या फटक्याच्या नादात आपली विकेट बशीरला बहाल केली. बशीरने पंतसाठी एक जाळं टाकलं. त्यात षटकाराचा काटा टापून त्याने पंतचा काटा काढला. पंत सहज त्या जाळ्यात अडकला. पुढे नितीश कुमार रेड्डीने निराश केले. अवघ्या एका धावेवर व्होक्सने त्याचा त्रिफळा उडवला. मधल्या फळीत नितीशला सोनं करण्याची संधी होती, पण त्याने माती केली.
अब तुम्हारे हवाले साथियों…
पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत हिंदुस्थानची मधली फळी कोलमडली होती. आता दुसऱया कसोटीच्या पहिल्या डावात मधल्या फळीत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी गिल आणि जाडेजा जोडीला आहे. या दोघांनी तिसरे सत्र सावरताना 99 धावांची भागी रचली आहे. आता एजबॅस्टनचा इतिहास बदलायचा असेल तर त्याचा पाया रचण्यासाठी हिंदुस्थानला किमान 500 धावांचा टप्पा गाठावा लागेल. याचाच अर्थ गिल-जाडेजाला आपली भागी आणखी मोठी करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर, वॉशिंग्टनला सुंदर खेळी करणे क्रमप्राप्त आहे. हिंदुस्थानचा अर्धा संघ आणखी किती मोठी मजल मारतोय ते उद्या कळेल.
तीन बदलांसह उतरला संघ
हिंदुस्थानी संघाची संभ्रमावस्था शेवटपर्यंत कायम होती. बुमरा खेळणार की नाही याचा सस्पेन्स गिलने टॉसच्या आधी उघड केला आणि संघ तीन बदलांसह एजबॅस्टनला उतरत असल्याचे सांगितले. बुमराच्या जागी दुसरा फिरकीवीर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. पहिल्या कसोटीत विशेष काही करू न शकलेल्या शार्दुल ठापूरची जागी नितीश कुमार रेड्डीने घेतली, तर साई सुदर्शनला बाहेर करत आकाश दीपला आजमावण्याचा निर्णय घेतला.
गिलची शतकी हॅटट्रिक
हिंदुस्थानच्या नव्या पर्वाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने गेल्यावर्षी धर्मशाळा कसोटीत 110 धावा केल्या होत्या तर लीड्स कसोटीत 147 धावांची तडाखेबंद खेळी केली होती आणि आता त्यात नाबाद 114 धावांचीही भर घातली. हिंदुस्थानसाठी कर्णधार म्हणून सलग दोन शतके आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटीत शतके हे दोन्ही विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्याने कर्णधार म्हणून सलग दोन द्विशतकेही रचली आहेत.