गांगुली, धोनी, कोहलीलाही जमलं नाही; लागोपाठ शतकांसह गिलनं करून दाखवलं, ब्रॅडमन, सोबर्स यांच्या पंक्तीत मिळालं स्थान

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एजबेस्टन येथे सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हिंदुस्थानने कर्णधार शुभमन गिलच्या नाबाद 114 आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद 41 धावांच्या बळावर 5 बाद 310 धावा केल्या. शुभमन गिल याने कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले, तर कर्णधार म्हणून हे त्याचे दुसरे शतक ठरले. यासह त्याचा महान फलंदाजांच्या एका खास क्लबमध्येही समावेश झाला.

दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. केएल राहुल 2 धावांवर बाद झाल्यानंतर यशस्वी जैसवाल आणि करुण नायर यांनी अर्धशतकीय भागी केली. लंचसाठी काही चेंडू बाकी असताना करुण नायर 31 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल चौथ्या स्थानावर आले.

गिलने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. सुरुवातीला एकेरी, दुहेरी धावांवर त्याने भर दिला. मात्र एकदा जम बसल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याने सीमारेषा दाखवली. त्याने 199 चेंडूत शतकाला गवसणी घातली. खेळ थांबला तेव्हा तो 216 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 114 धावा काढून नाबाद होता.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीतही गिलने शतक ठोकले होते. आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने शतक ठोकत थेट सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. इंग्लंडमध्ये मालिकेत्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत शतक ठोकणारा गिल नववा कर्णधार ठरला आहे.

ICC Test Ranking – लागोपाठच्या शतकाने पंतला फायदा

इंग्लंडमध्ये पहिल्या दोन्ही कसोटीत शतक ठोकणारे खेळाडू

1938 – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) 144 धावा, 102 धावा (ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स)
1947 – एलन मेलविले (दक्षिण आफ्रिका) 189 धावा, 117 धावा (ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स)
1953 – लिंडसे हॅसेट (ऑस्ट्रेलिया) 115 धावा, 104 धावा (ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स)
1966 – गारफील्ड सोबर्स (वेस्ट इंडिज) 161 धावा, 163 धावा, (ओल्ड ट्रॅफर्ड आणि लॉर्ड्स)
1973 – बेवन कॉन्गडन (न्यूझीलंड) 176 धावा, 175 धावा (ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स)
1990 – मोहम्मद अजहरुद्दीन (हिंदुस्थान) 121 धावा, 179 धावा (लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड)
2003 – ग्रीम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) 277 धावा, 259 धावा (एजबेस्टन आणि लॉर्ड्स)
2014 – अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) 102 धावा, 160 धावा (लॉर्ड्स आणि हेडिंग्ले)
2025 – शुभमन गिल (हिंदुस्थान) 147धावा, नाबाद 114 धावा (हेडिंग्ले आणि एजबेस्टन)

अविश्वसनीय अन् अवघड; बुमराच्या विश्रांतीच्या निर्णयावर रवी शास्त्री हैराण