कानपूर कसोटी – पहिल्या दिवसाचा खेळ संपला, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाची तगडी भागिदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
partnership
फोटो सौजन्य - BCCI ट्विटर

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी टीम इंडियाने चार विकेटच्या मोबदल्यात 258 धावा केल्या. श्रेयस अय्यर 75 आणि रवींद्र जडेजा 50 धावांवर नाबाद आहे. खराब प्रकाशामुळे केवळ 84 षटकेच खेळता आली. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांची 113 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.

कानपूर कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सत्रात शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने एका विकेटवर 82 धावा केल्या. पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या सत्रात गिल लवकर बाद झाला. सत्राच्या पहिल्याच षटकात गिलने (52 धावा) काइल जेमसनला त्याची विकेट दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने चेतेश्वर पुजारा आणि रहाणेच्या विकेट्सही गमावल्या. अजिंक्य रहाणे 35 आणि चेतेश्वर पुजाराने 26 धावा करून बाद झाले.

पहिल्या दिवसाचा खेळ कमी प्रकाशामुळे लवकर थांबवावा लागला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 84 षटकात 4 बाद 258 धावा अशी स्थिती होती.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा

ही घटना टीम इंडियाच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली. त्यावेळी मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल फलंदाजी करत होते. स्टँडवर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा ऐकू येत होत्या. याशिवाय चाहत्यांनी भारतीय सलामीवीरांना पाठिंबा देण्यासाठी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.

राजकीय आणि राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात अद्याप द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच दोन्ही देश आमनेसामने येतात. दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी हिंदुस्थानचा दौरा केला. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान संघ 2-1 ने जिंकला, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.

अलीकडेच T20 वर्ल्ड कप 2021 च्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले. त्या सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानचा 10 गडी राखून पराभव केला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदुस्थानला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी 50 आणि 20 षटकांच्या विश्वचषकासह एकूण 12 सामने झाले होते, ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता.