#INDvsSA धरमशालात पावसाचा ‘खेळ’, पहिला सामना एकही चेंडू न टाकता रद्द

606

न्यूझीलंडमध्ये दारुण पराभव सहन करावा लागल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर राग काढण्यासाठी हिंदुस्थानच्या संघाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण धरमशाला येथे होणारा पहिला एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 12 मार्चला धरमशाला येथे होणार होता. मात्र एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला आहे. धरमशाला येथे दिवसभर पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे नाणेफेकही होऊ शकला नाही. सायंकाळी 6.30 वाजता सामना 20-20 षटकांचा करण्याबाबत निर्णय होणार होता, मात्र पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. खराब वातावरण आणि कोरोन व्हायरसमुळे या लढतीचे फक्त 40 टक्के तिकिटविक्री झाली होती. आता मालिकेतील दुसरा सामना 15 मार्चला लखनौ येथे होणार आहे.

आफ्रिकेचा एकही पत्रकार नाही
हिमाचल क्रिकेट असोसिएशनने सामन्याबाबत बोलताना सांगितले की, या लढतीवर कोरोना व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे. सामना पाहण्यासाठी 1000 पेक्षा विदेशी प्रेक्षक येतील अशी आम्हाला आशा होती. परंतु या मालिकेसाठी आफ्रिकेचा एकही पत्रकार आलेला नाही.

‘बीसीसीआय’चे वैद्यकीय पथक सज्ज
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतींसाठी आपले वैद्यकीय पथक सज्ज केले आहे. क्रिकेट संघाच्या निवासाची व्यवस्था असलेले हॉटेल, विमानसेवा व वैद्यकीय पथक या सर्वांना आपापल्या सेवा पुरविण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे.

हेड टू हेड
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 85 एक दिवसीय लढती झाल्या आहेत. यातील 35 लढती टीम इंडियाने तर 46 लढती पाहुण्या संघाने जिंकल्या आहेत. तीन लढती टाय झाल्या, तर एक लढत काही कारणास्तव रद्द करू झाली होती. हिंदुस्थानमध्ये दोन्ही संघ 52 वेळा आमनेसामने आले आहेत. यात यजमान संघाने 27 आणि पाहुण्या संघाने 21 लढती जिंकल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या