
सलामीच्या लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिकेत आघाडी घेणाऱया हिंदुस्थानी संघाने आता दुसरा सामना जिंकून मालिका विजयाचे ध्येय ठेवले आहे. मंगळवारी होणाऱया सामन्यात रजत पाटीदार किंवा रिंकू सिंह या नव्या दमाच्या खेळाडूंपैकी कोणाला टीम इंडियात संधी मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत. अनुभवी श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यानंतर कसोटी संघात दाखल झाल्याने मधल्या फळीतील एक जागा रिक्त झाली आहे.
गतवर्षी हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिकेत 3-0 फरकाने हरविले होते. त्यामुळे उद्याचा दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घालण्याच्या इराद्याने हिंदुस्थानी खेळाडू मैदानावर उतरतील. रिंकू सिंहने अलीकडच्या काळात टी-20 क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. मात्र, त्याच्याकडे फिनिशर म्हणून बघितले जाते. त्यामुळे संघातील चौथ्या स्थानासाठी रजत पाटीदारला संधी मिळण्याची अधिक शक्यता वाटते.
यावेळी टीम इंडियात फिनिशरच्या भूमिकेत संजू सॅमसन आहे. तो कर्णधार लोकेश राहुलनंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. या लढतीत पाटीदार व रिंकू या दोघांनाही संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी तिलक वर्मा किंवा सॅमसनला बाकावर बसावे लागेल, पण असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पहिल्या सामन्यात तिलकला केवळ तीनच चेंडू खेळायला मिळाले होते, तर सॅमसनला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती. युवा सलामीवीर साई सुदर्शनने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करीत आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याला वगळण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरीकडे क्विंटन डिकॉकच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात ताळमेळ बसविण्याचे आव्हान असेल. कारण डिकॉकमुळे रासी वॅन डेर डुसेन, हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर या फलंदाजांना आपली नैसर्गिक फलंदाजी खेळण्याची मोकळीक मिळते. त्याच्या गैरहजेरीत हिंदुस्थानी स्विंग गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपुढे असेल.
























































