
टीम इंडियाचा संघ सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत व्यस्त आहे. आज बुधवारी दोन्ही संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर निर्णायक सामना होणार आहे. या टी-20 मालिकेनंतर हिंदुस्थानचा संघ विंडीजविरुद्ध एक दिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन बाद झाला आहे. दुखापतीमुळे धवन एक दिवसीय मालिकेला मुकणार आहे. धवनच्या जागी कसोटीमध्ये दमदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालची वर्णी लागली आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेदरम्यान शिखर धवनच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने तो विंडीजविरुद्धची टी-20 मालिका खेळू शकला नाही. अद्याप तो दुखापतीतून सावरला नसल्याने एक दिवसीय मालिकेतूनही तो बाद झाला आहे. हिंदुस्थानचा संघ टी-20 मालिका संपल्यानंतर विंडीजविरुद्ध 3 एक दिवसीय सामन्यांची मालिका खेलणार आहे. 15 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या लढतीने एक दिवसीय मालिकेचा शुभारंभ होईल.
मयांक अग्रवालला संधी
घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये दमदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल याची शिखर धवनच्या जागी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मासोबत मयांकला अथवा के.एल. राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळेल की नाही हे माहित नाही. कसोटीमध्ये छाप सोडणारी ही जोडी एक दिवसीय क्रिकेटमध्येही हिंदुस्थानला लाभदायक ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
धवनला दुखापतींचे ग्रहण
शिखर धवनला 2019 हे वर्ष त्रासदायकच गेले. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान महत्त्वाच्या लढतीत त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता. ऐनवेळी महत्त्वाचा खेळाडू संघातून बाहेर गेल्याने टीम इंडियाचे पुढे काय झाले हे आपण पाहिलेच. या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने पुनरागमन केले, मात्र आता तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे.



























































