जलसंवर्धनावर कृतिशील आराखडय़ासाठी 12 एप्रिलला इंडिया वॉटर व्हिजन परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलसंवर्धन आणि जल नियोजनाबाबत विचारमंथन आणि धोरणात्मक कृतिशील आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने  ‘ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने 12 एप्रिल रोजी ‘इंडिया वॉटर व्हिजन 2040’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

येत्या 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत विलेपार्ले येथील बी. जे. सभागृहात ही परिषद होणार असून  या परिषेदेचे उद्घाटन केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते होणार आहे.

या परिषदेत राष्ट्रीय जल परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने देशातील पाण्याची परिस्थिती आणि वातावरण बदलाचा पाण्यावर होणारा परिणाम यावर विचारमंथन होईल. या परिषेदत इस्रायलचे जल व्यवस्थापनाचे मॉडेल तज्ञांद्वारे सादर करण्यात येणार असून हे मॉडेल देशात कशा पद्धतीने राबविण्यात येईल याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेत यशस्वी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, तळागाळातील पाणी  व्यवस्थापनावर आधारित देशातील पहिला वॉटर स्टार्टअपचा सहभाग असेल. तसेच या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील कर्मचारी देशभरात राबविलेल्या विविध अनुभवांचे कथन करणार आहेत.

जल परिषदेत केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते यशस्वी जलसंवर्धन प्रकल्पांच्या माहिती-अभ्यास पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जलसंवर्धन- व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिष्ठत शास्त्र्ाज्ञ, व्यक्ती आणि संस्थांनाही परिषदेत सन्मानित कऱण्यात येणार आहे. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रावर परिणाम करणारा  पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून पाण्याविषयी आर्थिक व तांत्रिक क्षेत्राच्या अनुषंगाने बदल करण्याबद्दल या राष्ट्रीय जल परिषदेत चर्चेचे आयोजन  केले आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘सीओपी 26  ग्लासगो क्लायमेट चेंज’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्बन न्यूट्रल वॉटर पॉझिटिव्ह आणि शून्य डिस्चार्जचे ध्येय साध्य होत आहे.  देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे आहे, अशी माहिती ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक डॉ. विजय पागे यांनी दिली.