
हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले तसेच 6 मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मारले. याचे पुरावेही रोजच्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जगासमोर सादर केले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा हिंदुस्थान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उघडा पाडणार आहे. सर्व पुरावे यावेळी सादर करण्यात येणार असून त्यासाठी पथके पाठवण्यात येणार असल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.
शस्त्रसंधीच्या दुसऱ्या दिवशी जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील जनजीवन सर्वसामान्य होते, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून आजही अनेक भागांत ब्लॅकआऊट करण्यात आला. याचदरम्यान हिंदुस्थानच्या हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच असल्याचे जाहीर केले. याबाबत वेळोवेळी माहिती देणार असून अफवा पसरवू नका तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. जैसलमेर जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर कुणाला संशयित वस्तू किंवा स्पह्टके आढळली तर त्या ठिकाणाबद्दल पोलिसांना कळवावे. त्यांना हात लावू नये तसेच त्यांचे पह्टो आणि व्हिडीओ तयार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फिरोजपूर, पठाणकोटमध्ये शाळा बंद
पंजाब, अमृतसर, फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुरदासपूर, बटाला, फिरोजपूर आणि पठाणकोट येथे गरज असेल तर ब्लॅकआऊट करण्यास सांगण्यात आले आहे. जैसलमेरमध्ये मात्र रात्री 7.30 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत आणि बाडमेर येथे रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट राहणार आहे.
पोलीस, लष्करी अधिकाऱयांनी घेतला नुकसानीचा आढावा
पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा झाल्यामुळे जम्मू-कश्मीरसह विविध ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ घरांचे आणि अनेक मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. पोलीस आणि लष्करी अधिकाऱयांनी या नुकसानीचा आढावा घेतला.