
पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी यशस्वी जैसवालने जोश लिटलला ठोकलेल्या षटकार आणि चौकारामुळे हिंदुस्थानने डकवर्थ-लुईसनुसार आयर्लंडविरुद्ध अवघ्या दोन धावांनी विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
आज पहिल्या सामन्यात पावसाची दाट शक्यता होतीच, पण पहिल्या डावात वरुणराजाच्या कृपेमुळे आयर्लंडला पूर्ण 20 षटके खेळता आली, मात्र हिंदुस्थानला तो आनंद उपभोगता आला नाही. आयर्लंडच्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाडने 6 षटकांत 45 धावांची दमदार सलामी दिली. पण सातव्या षटकाच्या दुसऱया आणि तिसऱया चेंडूवर यंगने जैसवाल (24) आणि तिलक वर्माला (0) सलग चेंडूंवर बाद करत हिंदुस्थानची 2 बाद 46 अशी अवस्था केली. त्यानंतर पावसाचे जोरदार आगमन झाले आणि खेळ तेथेच थांबला, जो पुन्हा सुरू होऊ शकला नाही. आता दुसरा सामना रविवारी खेळविला जाईल. पुनरागमनवीर जसप्रीत बुमरा सामनावीर ठरला. आज त्याच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंग यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
जैसवालच्या दहा धावा निर्णायक ठरल्या
सहाव्या षटकांतच आकाश काळेकुट्ट झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता होती. तेव्हाच जैसवालच्या बॅटमधून चौकार आणि षटकार निघाले आणि आपल्या धावा 45 पर्यंत पोहोचल्या. याच दहा धावांनी हिंदुस्थानला 3 धावांची आघाडी मिळवून दिली होती. मग यंगने सलग चेंडूंवर जैसवाल आणि वर्माला टिपून खळबळ माजवली. यंगला हॅटट्रिकची संधी होती, पण संजू सॅमसनने ती साकार होऊ दिली नाही. तेव्हाच पाऊस आला आणि अवघा सामनाच भिजवून गेला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमानुसार आयर्लंड 1 बाद 45 तर हिंदुस्थान 2 बाद 47 असा दोन धावांनी आघाडीवर होता. पुन्हा सामना सुरू होऊच न शकल्यामुळे जैसवालचे चौकार-षटकार हिंदुस्थानला दोन धावांनी विजय मिळवून देणारे ठरले.
5 बाद 31 वरून 7 बाद 139
तत्पूर्वी, 11 महिन्यांनी पुनरागमन करणाऱया जसप्रीत बुमराने आपल्या पहिल्याच षटकात आयर्लंडच्या ऍण्डी बालबर्नी (4) आणि लॉरकन टकर (0) यांना बाद केले. यानंतर आयर्लंडला आणखी तीन हादरे बसले आणि त्यांची 5 बाद 31 अशी दुर्दशा झाली. पण कर्टिस कॅम्फर (39) आणि मार्क अडायरने 28 धावांची तर बॅरी मॅकर्थीने 33 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकार ठोकत आयर्लंडला अनपेक्षितपणे 139 धावांपर्यंत नेले. 6 षटकांत 31 धावांत अर्धा संघ गमावणाऱया आयर्लंडने पुढील 80 चेंडूंत 108 धावा चोपून काढल्या. या नवख्या संघाला गुंडाळण्यात हिंदुस्थानचे गोलंदाज अपयशी ठरले. बुमरासह प्रसिध कृष्णा आणि रवी बिष्णोई यांनीही प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.



























































