जागतिक ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानला भोपळा, अमेरिकेने राखले वर्चस्व ; केनिया दुसऱया स्थानी

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या यंदाच्या आवृत्तीसह सलग पाचव्यांदा पदतालिकेत अव्वल स्थान मिळवत अमेरिकेने आपले वर्चस्व राखले. टोकियो येथे पार पडलेल्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेने सर्वाधिक 16 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह सर्वाधिक 26 पदकांची कमाई केली. तर केनियाने 7 सुवर्णांसह 11 पदके जिंकून दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले. विशेष म्हणजे डझनभर खेळ असलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानला आपल्या पदकाचे खातेही उघडता आले नाही.

या स्पर्धेत हिंदुस्थानचा ‘गोल्डन’ बॉय नीरज चोप्राही सहभागी होता, मात्र नीरजला अंतिम फेरीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने हिंदुस्थानच्या पदकाची आशा मावळली. बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या गेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. नीरजच्या रूपाने हिंदुस्थानला एकमेव पदक जिंकता आले होते, मात्र यंदा नीरजला पदकाने हुलकावणी दिली. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात 1983 मध्ये हेलसिंकी (फिनलँड) येथे झाली होती. सुरुवातीला दर चार वर्षांनी स्पर्धा ही भरवली जात होती. परंतु 1991 नंतर दर दोन वर्षांनी स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेच्या गेल्या पाच आवृत्त्यांमध्ये बलाढय़ अमेरिकेने आपला दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, यंदा मेलिसा जेफरसन वुडन ही सर्वात यशस्वी अमेरिकन खेळाडू ठरली. तिने महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत तसेच 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले.

आशियाई देशांना ‘सुवर्ण’ नाहीच

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकाही आशियाई देशाला सोनेरी कामगिरी करता आली नाही. चीन, जपान आणि कोरिया यांसारख्या देशांनाही सुवर्णपदक जिंकता आले नाही. जपानने 2 कांस्य तर कोरियाने 1 रौप्य पदक मिळवले.