शीतल देवीचा तिरंदाजीत पराक्रम, विश्वविक्रम मोडला, पण अव्वल स्थान एका गुणाने हुकले

अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या पॅरालिम्पिकच्या क्रीडा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या तिरंदाज शीतल देवीने सर्वांना थक्क करणारी कामगिरी केली. दोन्ही हात नसलेल्या शीतलने पात्रता फेरीत 698 गुणांचा विश्वविक्रम मागे टाकत 703 गुण मिळवले. मात्र तिच्यानंतर तुर्कीच्या ओझनूर गिर्डीने 704 गुण मिळवत शीतलचा विश्वविक्रम मागे टाकला आणि अंतिम सोळा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

हांगझाऊ आशिया क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकून देणाऱ्या जम्मू-कश्मीरच्या 17 वर्षीय तिरंदाज शीतल देवीने पहिल्याच दिवशी आरपार निशाणा लावत पदकाच्या शर्यतीत झेप घेतली. तिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड गटात 720 पैकी 703 गुण मिळवले. पात्रता फेरीत याआधी 698 गुणांचा विश्वविक्रम ब्रिटनच्या फोबो पीटरसनच्या नावावर होता. शीतलने तो मागे टाकला, मात्र पुढच्या फेरीत ओझनूरने 704 गुण मिळवले.

शीतल अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे या प्रकारात हिंदुस्थानला पदकाचे खाते उघडण्याची संधी लाभली आहे.
शीतलला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता ती चिलीच्या मारियाना जुनिगा आणि कोरियाच्या चोई ना मी यांच्यात होणाऱ्या लढतीत विजेत्या खेळाडूशी भिडेल. जुनिगाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. ती पात्रता फेरीत 15 व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या एका फेरीत सरिता देवी या हिंदुस्थानी तिरंदाजानेही 682 गुणांसह नववा क्रमांक मिळवला आहे. तीसुद्धा अंतिम सोळामध्ये पोहोचली आहे.