
हिंदुस्थानी लष्कराच्या भूदल, नौदल आणि वायुदल अशा तिन्ही दलांमध्ये तरुणांना मोठय़ा प्रमाणात संधी मिळावी म्हणून आज ‘अग्निपथ भर्ती योजना’ सुरू करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात केली. वेतन आणि पेन्शनवर होणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 45 हजार तरुणांची भरती या योजनेंतर्गत केली जाणार आहे.
अग्निपथ भर्ती योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात सेवा देता येणार आहे. पहिली भरती येत्या 90 दिवसांत केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर सहा महिने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक जवानाला दरमहा 30 ते 40 हजार रुपये वेतन आणि इतर लाभ दिले जाणार आहेत. पेन्शनचा लाभ मात्र त्यांना दिला जाणार नाही. तिन्ही दलांमध्ये असलेल्या कायमस्वरूपी जवानांप्रमाणेच त्यांना मेडल्स, पुरस्कार आणि विमा मिळणार आहे.
सेवा निधी पॅकेज
- पेन्शन नसली तरी अग्नीवीरांच्या वेतनातून 30 टक्के रक्कम कापून त्यांच्या नावे जमा केली जाईल आणि तितकीच रक्कम सरकारतर्पै त्यात समाविष्ट केली जाईल.
- चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक अग्नीवीराला 11.7 लाख रुपये मिळतील.
- हा सेवा निधी करमुक्त असेल.
- अग्नीवीराचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सेवा निधीच्या रकमेसह 1 कोटी रुपये मिळणार.
- सेवेच्या ऊर्वरित कालावधीचे वेतनही दिले जाणार.
25 टक्के अग्नीवीरांना कायमस्वरुपी सेवेची संधी
चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्नीवीरांना त्यांची कामगिरी आणि शारीरिक फिटनेसच्या आधारे कायमस्वरुपी सेवेची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या अग्नीवीरांना पुढे 15 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे. सुरूवातीची चार वर्षे ते कंत्राटी असल्याने त्या काळाची पेन्शन त्यांना मिळणार नाही. चार वर्षे सेवा पूर्ण करणार्या अग्नीवीरांना लष्कराकडून प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे त्यांना पुढील करिअरसाठी बँकांकडून कर्ज मिळवण्यास प्राधान्य मिळेल.
अशी होणार भरती
- वयोमर्यादा 17 वर्षे सहा महिने ते 21 वर्षे
- शैक्षणिक पात्रता 10 वी ते 12 वी उत्तीर्ण
- मैदानी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी होणार
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पुढील शिक्षणही घेता येणार
- वेतन व विमा
- पहिल्या वर्षी वार्षिक 4.76 लाख रुपयांचे पॅकेज
- चौथ्या वर्षापर्यंत वार्षिक पॅकेज 6.92 लाखांपर्यंत जाणार
- धोक्याच्या ठिकाणी तैनाती असेल तर त्यासाठी विशेष भत्ते
- 44 लाखांचे विमा संरक्षण





























































