
शहापूर येथील जवान कृष्णात दिलीप कांबळे (वय 34) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कांबळे हे हिंदुस्तानी सैन्यात मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे आर्मी सर्व्हिस कोअर येथे सेवा बजावत होते.
सेवा बजावत असतानाच कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला. याचवेळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे पार्थिव घेऊन येणारे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी दिली.
जवान कांबळे यांच्या निधनाची बातमी शहापूरात समजली अन् गावावर शोककळा पसरली. शहीद कांबळे यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शहीद कांबळे यांनी सेवाकाळ पूर्ण केला. मात्र, त्यांना सैन्य दलाकडून दोन वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता.
त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व आठ वर्षीय कन्या असा परिवार आहे. कृष्णात कांबळे यांचे पार्थिव शहापुरात आणण्यात आले. तेथे काहीकाळ पार्थिव अत्यंदर्शनसाठी ठेवण्यात आले होते.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. कृष्णात कांबळे अमर रहे, अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या. शहापूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


























































