
अरुणाचल प्रदेशच्या कामेंग प्रांतातील पर्वतरांगामध्ये रविवारी हिमस्खलनाची मोठी दुर्घटना घडून त्यात लष्कराचे 7 जवान शहीद झाले आहेत. हे जवान रविवारी कामेंग प्रांतात गस्त घालण्यासाठी गेले असता ते बेपत्ता झाले होते. या जवानांना शोधण्यासाठी लष्कराने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते. यामध्येच आता हिमस्खलनात अडकून हे जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या विविध दुर्घटनांमध्ये एकूण 17 जवान शहीद झाले होते. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 6 जवानांचा मृत्यू झाला होता, तर इतर ठिकाणच्या दुर्घटनांत 11 जवान शहीद झाले होते. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये संसदेत ही माहिती दिली होती. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूल परिसरातील हिमस्खलनात नौदलाच्या 5 जवानांनी प्राण गमावला होता.




























































