हिंदुस्थानी लष्कराकडून पाकड्यांना तडाखा, 7 चौक्या उद्धवस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करणाऱ्या पाकड्यांना जोरदार तडाखा दिला आहे. हिंदुस्थानी लष्कर आणि ‘बीएसएफ’ने मुहतोड जवाब देताना पाकिस्तानी सैन्याच्या 7 चौक्या उद्धवस्त केल्या. यात पाकचे 3 सैनिक ठार झाले आहेत.

पुलवामा हल्ल्याचा जबरदस्त बदला घेताना हिंदुस्थानने हवाई स्ट्राईक करून पाकमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या हवाई स्ट्राईकपासून पाकडे बिथरले आहेत. पाकड्यांकडून रोज शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू असून सिमेलगतच्या गावांना आणि बीएसएफच्या चौक्यांना लक्ष्य केले जात आहे. सोमवारपासून पुंछ, नौशेरा, राजौरी, शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि तोफांचा मारा केला. यात बीएसएफचे एक इन्स्पेक्टर शहीद झाले. एक महिला आणि पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना पाकव्याप्त कश्मिरातील रखचिक्री आणि रावलकोट सेक्टरमधील पाक सैन्याच्या सात चौक्या पूर्णपणे उद्धवस्त केल्या आहेत.

हिंदुस्थानी जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकव्याप्त कश्मिरात पाक सैन्याची दाणादाण उडाली. मोठय़ा प्रमाणावर पाक सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाक सैन्याचे तीन जवान ठार झाल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी दिली आहे.

पाकला मुहतोड जवाब देणार – बीएसएफ
शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. पाकला मुहतोड जवाब दिला जाईल,असा इशारा बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा यांनी दिला आहे. पाकच्या गोळीबारात काल बीएसएफचे इन्स्पेक्टर जवान टी. अलेक्स शहीद झाले. शहीद अलेक्स यांच्या पार्थिवाला बीएसएफच्या जम्मूतील मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मिश्रा यांनी पाकला इशारा दिला आहे.