
आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समधील महिलांच्या 100 मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यतीत रविवारी चीनचा रडीचा डाव बघायला मिळाला. हिंदुस्थानी धावपटू ज्योती यराजी हिला फाऊल ठरविण्यात आले होते. मात्र, ज्योतीने यावर आक्षेप घेतला. रिप्लेमध्ये चीनचीच धावपटू यात दोषी सापडल्याने ज्योतीच्या कास्यपदकाचे रूपांतर रौप्यपदकात झाले. आशियाई स्पर्धेत 100 मीटर अडथळा शर्यतीत पदक जिंकणारी ज्योती पहिली हिंदुस्थान धावपटू ठरली हे विशेष!
अंतिम शर्यतीत चीनच्या वू यानी हिने प्रथम फाऊल स्टार्ट केला. वू हिने स्टार्ट घेतल्याचे लक्षात येताच हिंदुस्थानची ज्योती आणि जपानची युमी तनाका यांनीही स्टार्ट घेतला. त्याचवेळी फाऊल झाल्याचे घोषित करत पंचांनी फायर केले. त्यामुळे शर्यत थांबवण्यात आली व वू यानी आणि ज्योती या दोघींना बाद ठरवण्यात आले. त्यावर ज्योतीने आक्षेप घेतला. बरीच चर्चा झाल्यानंतर दोघींना धावू देण्याचा निर्णय झाला व शर्यत संपल्यावर पुन्हा फाऊल स्टार्ट तपासण्याचा निर्णय झाला. फाऊलच्या नाटय़ामुळे ज्योतीच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्यामुळे दुसऱ्यांदा शर्यत सुरू झाल्यानंतर ज्योतीने संथ प्रारंभ केला. अर्धे अंतर झाल्यावर तिने वेग वाढवला व चीनच्या वू यानी व लिन युवेईपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली. अखेर पंचांनी फाऊल स्टार्ट तपासल्यावर फक्त वू यानीला बाद करून ज्योतीला रौप्यपदक बहाल करण्यात आले.
ज्योतीने ही शर्यत 12.91 सेकंदांत पूर्ण केली. सुवर्णपदक विजेत्या लिन युवेई हिने 12.74 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. कांस्यपदक विजेत्या जपानच्या तनका युमी हिने 13.04 सेपंद वेळ नोंदविली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या ज्योतीने सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली हिंदुस्थानी ठरली होती. 12.78 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम ज्योतीच्या नावावर आहे.


























































