लेख – ब्रिटनमधील हिंदुस्थानींचा लेबर पक्षाला दणका

557

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानींच्या सॉफ्ट पॉवरचा हा विजय होता. अशाच प्रकारची सॉफ्ट पॉवर अमेरिका आणि युरोपातील इतर राष्ट्रांमध्ये वापरली पाहिजे. कारण युरोप, अमेरिका आणि कॅनडा या सर्वच देशांच्या प्रगतीत तिथे राहाणाऱया हिंदुस्थानींनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे त्या देशांची प्रगतीच होत आहे. या सर्व गोष्टींचा वापर या देशांची राजकीय धोरणे हिंदुस्थानच्या बाजूने वळवण्यासाठी केली पाहिजे. ग्रेट ब्रिटनमधील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी लेबर पक्षाने (कामगार पक्षाने) कश्मीरसंदर्भात हिंदुस्थानविरोधात जी विधाने केली होती ती मागे घेतली आहेत. लेबर पक्षाने दोन महिन्यांपूर्वी हिंदुस्थान कश्मीरमध्ये अत्याचार करतो आहे, तिथल्या लोकांचे मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत, कश्मीरला ‘प्लेबिसाईट’ म्हणजे सार्वभौमत्व देण्यात यावे, अशी विधाने केली होती.

25 सप्टेंबर रोजी लेबर पक्षाने आपल्या वार्षिक अधिवेशनात कश्मीरबाबत ठराव संमत केला. कश्मीर खोऱयात मानवी हक्कांचे भंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या हालचालीनंतर त्यांच्यावर हिंदुस्थानविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. लेबर पक्षाने अशी विधाने का केली असावी, याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये निवडणुका होणार आहेत. लेबर पक्षाला असे वाटते आहे की 39-40 जागा ते ग्रेट ब्रिटनमधे राहणाऱया पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या मदतीने जिंकू शकतात. त्यामुळे त्यांनी वरील विधाने करायला सुरुवात केली, जेणेकरून ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणारे मूळचे पाकिस्तानी नागरिक खूश होतील. अर्थातच यामुळे हिंदुस्थानात आणि ब्रिटनमधे राहणाऱया हिंदुस्थानी मूळच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

कश्मीर प्रकरणावर लेबर पक्षाने घेतलेल्या भूमिकेनंतर त्याचे हिंदुस्थानशी संबंध बिघडले. ग्रेट ब्रिटनमध्ये, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भारतने जनसंपर्क मोहीम सुरू केली. हा ट्रेंड संपूर्ण ग्रेट ब्रिटनमध्ये चालू झाला. बऱयाच हिंदू संघटनाही अशा प्रचारात व्यस्त होत्या. त्यांनी कामगार पक्षाच्या विरोधात आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले. अँटी इंडिया, हिंदू विरोधी कामगार पक्षाला नाकारण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.

ग्रेट ब्रिटनमधील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांनी आपली राजकीय ताकद वापरण्यास सुरुवात केली. एक गोष्ट इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ब्रिटनमध्ये 35 लाखांच्या आसपास हिंदुस्थानी नागरिक आहेत. तिथे असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांची संख्या 15 लाखांच्या आसपास आहे. ग्रेट ब्रिटनमधील सर्व हिंदुस्थानी एकत्र आले आणि त्यांनी तिथे एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीचा मुख्य उद्देश होता की लेबर पक्षाच्या हिंदुस्थानविरोधी विधानांमुळे येणाऱया निवडणुकांमध्ये ब्रिटनमधील हिंदुस्थानींनी लेबर पक्षावर बहिष्कार घालावा. ही चळवळ पाहता पाहता समाज माध्यमांच्या मदतीने ब्रिटनमध्ये सर्वदूर पसरली.

अखेर ब्रिटनमधील हिंदूंचा रोष शांत करण्यासाठी स्वतः लेबर पक्षाचे अध्यक्ष इयान लॉरी पुढे आले. ते म्हणाले, कश्मीरबाबत हिंदूंच्या भावनांची जाणीव पक्षाला आहे. आम्हाला माहीत आहे की, वार्षिक अधिवेशनातील ठरावामध्ये वापरल्या गेलेल्या भाषेमुळे हिंदुस्थानी समुदाय आणि हिंदुस्थानातील लोक दुःखी झाले आहेत. त्यांनी ब्रिटनमधील हिंदुस्थानींना एक पत्र लिहून सांगितले की, आम्ही हिंदुस्थानींच्या विरोधात नाही. आम्ही कश्मीरप्रश्न जाणतो, आम्ही पुन्हा एकदा जाहीर करतो की कश्मीर हा मुद्दा द्विपक्षीय आहे आणि तो हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील असून ते देश शांततेच्या मार्गाने परस्पर चर्चा करून तो सोडवू शकतात. त्यात तिसरा पक्ष हस्तक्षेप करू शकत नाही.’

थोडक्यात ब्रिटनमधील हिंदुस्थानी रहिवाशांचा विजय झाला आहे. एका अर्थी परदेशातील हिंदुस्थानीनी आपल्या सॉफ्ट पॉवरचा वापर तेथील राजकीय पक्षांना त्यांची राजकीय धोरणे बदलवण्यासाठी केला. ग्रेट ब्रिटनमधील हिंदुस्थानी तिथले सन्माननीय नागरिक आहेतच व ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. डॉक्टर्स, इंजिनीअर्स किंवा इतर महत्त्वाच्या जागी ते काम करतात. त्यामुळे त्यांनी ग्रेट ब्रिटनच्या प्रगतीला मोठा हातभार लावलेला आहे. हे लेबर पक्षाच्या लक्षात आले नव्हते. त्यांनी जास्त विचार न करता तिथल्या पाकिस्तानी मतदारांना खूश करण्यासाठी हिंदुस्थानविरोधी विधाने केली होती.

हिंदुस्थानींच्या तुलनेत ब्रिटनमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे योगदान ब्रिटनच्या प्रगतीमध्ये अगदीच नगण्य आहे. एवढेच नव्हे तर अनेक पाकिस्तानींना दहशतवादी किंवा कट्टरतावादींना मदत केल्याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. अनेक कट्टर संस्था पाकिस्तानी नागरिकांच्या मदतीने तेथे काम करत आहेत. त्याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या 15 ऑगस्टच्या दिवशी लंडनमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी हिंदुस्थानच्या ब्रिटनमधील वकिलातीवर हल्ला केला. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर होती. कितीही मतभेद असले तरी कोणीही वकिलातीवर हल्ला करू शकत नाही.

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय हे ग्रेट ब्रिटनमध्ये असलेले पाकिस्तानी नागरिक आणि खलिस्तानी दहशतवादी यांच्या मदतीने कश्मिरी-खलिस्तानी अशी मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रेट ब्रिटनने तेथे असलेल्या हेंदुस्थानी तसेच पाकिस्तानी नागरिकांना पारखले पाहिजे. तूर्त तरी ब्रिटनमधल्या हिंदुस्थानींच्या दबावामुळे लेबर पक्षाला अखेर शहाणपण सुचले आणि आता त्यांनी हिंदुस्थानींच्या विरोधात कुठलेही विधान करणार नाही असे जाहीर केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या