हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत जगातील पहिल्या पाचमध्ये येणार, सीईबीआरचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत 2025 पर्यंत मोठी वृद्धी होणार आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये हिंदुस्थान इंग्लंडला मागे टाकत पाचवे स्थान पटकावणार असल्याचे ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अॅण्ड बिझनेस रिसर्च’ या जागतिक स्तरावरील संस्थेच्या (सीईबीआर) अहवालातून स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थान सध्या जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत सहाव्या स्थानावर आहे.

हिंदुस्थानने 2019 मध्ये इंग्लंडला मागे टाकत जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले होते. मात्र त्यानंतर 2020 मध्ये आलेली कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने वृद्धी दर घसरला आहे. त्यामुळे हिंदुस्थान सहाव्या क्रमांकावर फेकला गेला असून पुढील चार वर्षे हीच स्थिती राहणार असल्याचे सीईबीआरने स्पष्ट केले आहे. त्यानंतर 2024 मध्ये हिंदुस्थानचा वृद्धी दर 5.8 टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडला मागे टाकत पाचवे स्थान पटकावेल. तसेच 2030 पर्यंत हाच वृद्धी दर राहणार असल्याने जर्मनी आणि जपानला मागे टाकत हिंदुस्थान तिसऱया स्थानावर झेप घेईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. तर चीन 2028 पर्यंत अमेरिकेला मागे टापून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असेही स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत मोठी घसरण

कोरोना महामारीमुळे देशात लावलेल्या लॉकडाऊनचा हिंदुस्थानला मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरात तब्बल 23.9 टक्क्यांची घट झाली होती, तर दुसऱया तिमाहीत 7.5 टक्क्यांची घट झाली आहे. त्यानंतर मात्र अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ लागल्याचेही ‘सीईबीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेतील घसरणीमुळे बँपिंग क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे.