IND vs ENG – हिंदुस्थानी संघ काळी पट्टी बांधून उतरला मैदानात, नक्की कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (निरंजन शहा मैदान) तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव 2 बाद 207 धावांवरून पुढे सुरू केला. यावेळी हिंदुस्थानचा संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला.

हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिंदुस्थानचे सर्व खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली.

अश्विनची माघार

राजकोट कसोटीत 500 बळींचा टप्पा पार केलेला आर. अश्विन तातडीने घरी परतला आहे. कुटुंबामध्ये वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याने अश्विनने माघार घेतली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला  असून कसोटीचे उर्वरित तीन दिवस 10 खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. अश्विनच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या खांद्यावर फिरकीची धुरा आहे.