चटकदार पाणीपुरी

>>रश्मी वारंग

काही पदार्थ म्हणजे निव्वळ जिभेचे चोचले असतात आणि हे माहीत असूनही आपण त्यांच्या प्रेमात असतो. असा बहुलोकप्रिय पदार्थ म्हणजे पाणीपुरी. या पाणीपुरीच्या चटकदारपणाची ही गोष्ट.

अनेक चाटपदार्थांचे मूळ उत्तर प्रदेशात दडलेले आहे, त्याला पाणीपुरी अपवाद नाही. असे म्हटले जाते की, पाणीपुरीचा जन्म अपघातानेच झाला असावा. राजकचोरी हे पाणीपुरीचे मूळ असावे. कारण दोघांच्या आकारात विलक्षण साम्य आढळते. चुकून लहान कचोरी तयार झाली असावी आणि मग पुढे जाणीवपूर्वक ती तशी बनवली गेली. देशभरात पाणीपुरी चवीने खाल्ली जाते. देशभरात व्यवसायानिमित्त पसरलेल्या पूरभय्यांनी पाणीपुरी स्वतःसोबत नेली. त्याआधी जलपात्र नामक संस्कृत नामासह पाणीपुरी अस्तित्वात होती असे संशोधकांचे म्हणणे आहे. या इतिहासापलीकडे पाणीपुरी एखाद्या चाटविव्रेत्याच्या प्रयोगातून तयार झालेली असण्याची शक्यता अधिक आहे. पाणीपुरी घरी तयार होण्यासाठी जन्माला आलेली नसावी असे तिच्या स्वरूपावरून वाटते. रस्त्यावर उभे राहून खाताना उपयोगी ठरणारी कडक पुरी आणि आतले प्रांतागणिक बदलणारे मिश्रण पाणीपुरीची लवचिकता दाखवते.

हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत पाणीपुरीचे नाव बदलत जाते. काही भागांत ती पुचका आहे, कुठे फुलकी, कुठे पानी के बताशे म्हणून ती आवडीने खाल्ली जाते, तर कुठे गोलगप्पा म्हणून आवडते. गुजरातच्या काही भागांत ती पकोडी (पकोडा नव्हे) आहे, तर काही अन्य ठिकाणी गपचप. पश्चिम बंगाल या पुचक्यांसाठी खास ओळखला जातो. त्यातही कोलकात्यातील दही पुचके एकदम खासमखास.
जगभरातील खवय्यांसाठी पाणीपुरी नवीन नाही. देश-विदेशातील संस्कृतीनुसार बदलता येणाऱया सारणामुळे पाणीपुरी ग्लोबल झाली आहे. काही वेळा आतल्या बटाटा, रगडा यांची जागा चक्क चिकन, कोळंबीही घेऊ लागली आहे.

पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती विरळाच. तिचा तिखट-गोड स्वाद आनंद देतो. एकाच वेळी डोळय़ांतून पाणी काढायला लावणारी आणि त्याच वेळी अत्यानंद देणारी पाणीपुरी हटके आहे. भलामोठा आ वासत भररस्त्यात हातात वाटी घेऊन ती आपल्याला उभे करते. तिच्या स्वादापायी शिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडायला आपण तयार होतो.

गरीब-श्रीमंतीच्या सीमारेषा पुसत सगळय़ांना समान पातळीवर आणणारी चटकदार पाणीपुरी म्हणूनच आबालवृद्धांना प्रिय आणि स्ट्रीट फूडची महाराणी ठरते यात आश्चर्य नाही.

10 मार्च 2005 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने पाणीपुरी नावाचा समावेश करत पाणीपुरीच्या ग्लोबल असण्यावर शिक्कामोर्तब केले.